काजलच्या मारेकऱ्यास सात दिवसांचा पीसीआर
By Admin | Updated: October 28, 2016 00:42 IST2016-10-28T00:42:19+5:302016-10-28T00:42:19+5:30
तालुक्यातील आवळगाव येथील काजल राजेंद्र दुमाने या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली होती.

काजलच्या मारेकऱ्यास सात दिवसांचा पीसीआर
ब्रह्मपुरी : तालुक्यातील आवळगाव येथील काजल राजेंद्र दुमाने या मुलीवर अतिप्रसंग करून हत्या करण्यात आली होती. बुधवारी आरोपी राजेंद्र दयाराम शेंडे रा. आवळगााव (३५) याला अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला जिल्हा सत्र न्यायालय चंद्रपूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
२३ आॅक्टोबरला आवळगाव शेतशिवारात काजल दुमाने या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे आरोपीला पकडण्याचे ब्रह्मपुरी पोलीस व मेंडकी चौकी पोलिसांसमोर आव्हान उभे होते. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अतिरीक्त पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपुत, एलसीबी पथकाचे प्रमुख पगारे, एपीआय राठोड, ब्रह्मपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी, पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर, मेंडकी पोलीस चौकीचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर पिसे व त्यांचे सहकारी यांनी तपासाची चक्रे फिरविली व दोन दिवसात गुन्हेगाराला अटक केली.
गुरुवारी त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीस सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात आरोपीने अतिप्रसंग केला की हत्याच केली, यासाठी त्याने इतरांची मदत घेतली काय, असे विविध प्रश्न उलगडण्याचे काम पोलिसांना करावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)