१ जानेवारीपासून सेट टॉप बॉक्स अनिवार्य
By Admin | Updated: December 20, 2015 00:51 IST2015-12-20T00:51:53+5:302015-12-20T00:51:53+5:30
जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रात ग्राहकांना डिजीटल प्रक्षेपण पाहण्यासाठी ...

१ जानेवारीपासून सेट टॉप बॉक्स अनिवार्य
जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : नागरी क्षेत्रातील गावांनाही निर्देश
चंद्रपूर : जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रात ग्राहकांना डिजीटल प्रक्षेपण पाहण्यासाठी ३१ डिसेंबरपूर्वी सेटटॉप बॉक्स किंवा डी.टी.एच. जोडणी लावणे आवश्यक असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे व निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यावेळी उपस्थित होते.
यावेळी म्हैसेकर म्हणाले, भारत सरकारच्या सूचना तथा प्रसारण मंत्रालयातर्फे ११ नोव्हेंबर २०११ द्वारे प्रत्येक केबल प्रचालकांना कोणत्याही टेलिव्हिजन चॅनल कार्यक्रमाचे प्रक्षेपण,प्रसारण हे डिजीटल संबोध्य प्रणालीचे माध्यमातून करणे अनिवार्य केलेले आहे. त्यानुसार टप्पा-३ मधील महानगरपालिका,नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्र यांना ३१ डिसेंबर २०१५ पर्यंत ही कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व केबल ग्राहकांना डिजीटल प्रक्षेपण पाहण्यासाठी डिजीटल सेटटॉप बॉक्स किंवा डी.टी.एच. जोडणी लावणे अनिवार्य असून जे ग्राहक सेटटॉप बाक्स किंवा डी.टी.एच. लावणार नाहीत, अशा केबल ग्राहकांना केबलद्वारे होणारे प्रक्षेपण दिसणार नाही. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून व्यापक प्रसिद्घी देण्यात आल्याचीही माहिती त्यांनी दिलीे. चंद्रपूर जिल्ह्यात नागरी क्षेत्रात ६७ हजार १०७ जोडण्या असून नागरी क्षेत्रातील गावात १६ हजार ७५ इतक्या केबल जोडण्या आहेत. चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, भद्रावती, मूल, बल्लारपूर, राजुरा, गोंडपिपरी, शिवाजीनगर (माजरी), कोंडूमाल, दुगार्पूर, उर्जानगर, ताडाली, पडोली, घुग्घुस, नकोडा, नांदगाव (पोडे), विसापूर, आवारपूर (कोरपना), नांदा (कोरपना), गडचांदूर, सास्ती व धोपटाळा यांचा यात समावेश आहे. (शहर प्रतिनिधी)
उपलब्ध असलेले सेटटॉप बॉक्स
चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत जि.टी.पी.एल. केबल नेटवर्क या कंपनीने सध्या सहा हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. यु.सी.एन. केबल नेटवर्क कंपनीने आठ हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. सी.टी.केबल नेटवर्क कंपनीने १० हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. वि.सी.सी.एन. केबल नेटवर्क कंपनीने एक हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. जैन हिट्रस केबल नेटवर्क कंपनीने एक हजार सेटटॉप बॉक्स उपलब्ध करुन दिलेले आहेत. याशिवाय सेटटॉप बॉक्स तात्काळ उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व बहुविध यंत्रणा चालकांना जिल्हा प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांकडे करावी तक्रार
सेटटॉप बॉक्सची किंमत १२०० ते १४०० रुपयापर्यंत आहे. आणि ही रक्कम केवळ एकाचवेळी भरायची आहे. या संदर्भात केबल आॅपरेटरबाबत काही तक्रार असल्यास ती तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदवा, असेही यावेळी जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी स्पष्ट केले.