जिल्हा नियोजनासाठी मंजूर निधीचा खर्च वेळेत करा

By Admin | Updated: November 21, 2015 00:51 IST2015-11-21T00:51:54+5:302015-11-21T00:51:54+5:30

पुढील वर्षी पाणी अडवा पाणी जिरवा, मामा तलावाचे नूतनीकरण, जलयुक्त शिवार, मत्स्य संवर्धन व दुग्धविकास या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.

Set up the expenses of approved funds for district planning in time | जिल्हा नियोजनासाठी मंजूर निधीचा खर्च वेळेत करा

जिल्हा नियोजनासाठी मंजूर निधीचा खर्च वेळेत करा

सुधीर मुनगंटीवार : पाणी, मत्स्य संवर्धन आणि दुग्धविकास विभागाचा घेतला आढावा
चंद्रपूर : पुढील वर्षी पाणी अडवा पाणी जिरवा, मामा तलावाचे नूतनीकरण, जलयुक्त शिवार, मत्स्य संवर्धन व दुग्धविकास या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. या संबंधित विभागांनी आतापासून आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. जिल्हा नियोजनचा पुढील वर्षीचा फोकस याच विषयावर असणार असून त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी आपला सर्वंकष आराखडा तत्काळ तयार करावे तसेच जिल्हा नियोजन समितीत तरतूद करण्यात आलेला विविध विकास कामांवरील निधी यंत्रणांनी वेळेत खर्च करण्याच्या सुचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.
जिल्हा नियोजन समितीची सभा गुरूवारी पार पडली. या सभेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. शोभाताई फडणवीस, आ. अनिल सोले, आ. नाना शामकुळे, आ. विजय वडेट्टीवार, आ. संजय धोटे, आ. सुरेश धानोरकर, आ. कीर्तिकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सन २०१५-१६ च्या खर्चाचा आढावा घेतला. जिल्हा नियोजनचा खर्च जिल्ह्यातच व्हावा व यासाठी लागणाऱ्या मान्यता जिल्हाधिकारी यांच्या स्तरावरुनच देण्यात याव्यात, अशी सूचना यावेळी करण्यात आली. मुख्यालयी न राहणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला दिले. आरोग्य सेवा व सुविधांची माहिती नागरिकांना देण्यासाठी अभियान राबविण्याची सूचनाही त्यांनी केली.
१०८ या सुविधेबाबतही जागृती करण्यात यावी. जिल्ह्यातील राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा मार्ग खड्डेमुक्त करण्याचा पथदर्शी प्रकल्प राज्यात प्रथम चंद्रपूर जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या विषयीचा आराखडा बांधकाम विभागाने तयार करावा असे त्यांनी सांगितले.
विद्युत विभागाला ५ हजार ९०० जोडण्या पूर्ण करण्याचा लक्षांक दिला आहे. आॅक्टोबरअखेर २ हजार ६३१ जोडण्या पूर्ण झाल्या असून उर्वरीत जोडण्या या लवकर पूर्ण करण्यात येणार असल्याचे विद्युत विभागाने यावेळी सांगितले. प्रलंबित जोडण्या तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. उद्योगाला चालना देण्यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्यासाठी नियोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. 
लघु गटाने शिफारस केलेला २०१६-१७ चा वार्षिक आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजना २०१६-१७ साठी अधिकाऱ्यांची मागणी ३३२ कोटी ७६ लाख २६ हजार रूपयांची होती. तर १४४ कोटी ४३ लाख एवढ्या निधीची लघु गटाने शिफारस केली होती. हा आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात आला. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
उपस्थित आमदार शोभाताई फडणवीस, विजय वडेट्टीवार, नानाभाऊ शामकुळे, संजय धोटे, सुरेश धानोरकर व कीर्तिकुमार भांगडिया आदी सदस्यांनी लोकहिताचे अनेक प्रश्न यावेळी मांडले व त्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीस विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Set up the expenses of approved funds for district planning in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.