सत्र संपत आले, गुरुजीचा पत्ताच नाही !
By Admin | Updated: January 31, 2015 23:18 IST2015-01-31T23:18:15+5:302015-01-31T23:18:15+5:30
ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा कांगावा अधिकारी करीत असले तरी प्रत्यक्षात पहाडावरील शाळांची अवस्था वाईट आहे. देवलीगुडा, येल्लापूर(खु),

सत्र संपत आले, गुरुजीचा पत्ताच नाही !
जिवती : ग्रामीण भागातील शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा कांगावा अधिकारी करीत असले तरी प्रत्यक्षात पहाडावरील शाळांची अवस्था वाईट आहे. देवलीगुडा, येल्लापूर(खु), मरकलमेंढा, गुडसेला, रायपूर, कमलापूर, परमडोली, धर्मारम शाळेत शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शाळेचे सत्र संपत आले. मात्र शाळेला अद्यापही ‘गुरुजी’ मिळाले नाहीत. त्यामुळे कुठे एका शिक्षकाला तर कुठे पाच वर्गाला दोन शिक्षकांना शिकविण्याची कसरत करावी लागत आहे.
शिक्षण विभागाच्या अध्यादेशानुसार काही शाळांला पाच वर्गाची बढती मिळाली, तर काही शाळेतील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. मात्र त्या ठिकाणी दुसरा शिक्षक देण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखविले नाही. त्यामुळे आहे त्या शिक्षकांवरच अधिक ताण पडत आहे. शालेय सभा, डाक पोहचविणे इत्यादी शालेय कामकाजामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान होत आहे. एकाच शिक्षकावर शाळेचा भार असल्याने पहाडावरील शाळांतील शिक्षणाचा खेळखंडोबाच होत असल्याचा प्रकार प्रस्तुत प्रतिनिधीने शाळा भेटी दिल्यानंतर समोर आला आहे. देवलागुडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते पाच वर्ग असून ७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या ठिकाणी मात्र दोनच शिक्षक आहे. येल्लापूर (खु.) वर्ग चार, शिक्षक-एक, विद्यार्थी २५, मरकलमेंढा वर्ग आठ शिक्षक-चार, विद्यार्थी ११४, गुडसेला वर्ग चार शिक्षक एक, विद्यार्थी ६१; रायपूर वर्ग चार, शिक्षक एक, विद्यार्थी सात; परमडोली वर्ग आठ, शिक्षक चार, विद्यार्थी ४०; धर्मारम वर्ग चार, शिक्षक-एक, विद्यार्थी १६; कमलापूर वर्ग चार, शिक्षक एक, विद्यार्थी सात अशी या शाळांची पटसंख्या आहे. येथील मुख्याध्यापकांना शिक्षण विभागासोबत पत्रव्यवहार, बैठका व इतर शालेय कामासोबतच चारही वर्ग शिकविण्याची मोठी जबाबदारी पार पाडावी लागत आहे. एका वर्गाला शिकविताना दुसऱ्या वर्गातील विद्यार्थ्यांना मात्र स्वयंअध्ययन केल्याशिवाय पर्याय राहात नाही. त्यामुळे दिवसभरात या विद्यार्थ्यांच्या नशिबी एक किंवा दोन तास येतात. याबाबत संबंधीत विद्यार्थ्यांच्या पालकांनी अनेकवेळा शासन प्रशासनाकडे शिक्षकाची भरती करावी, अशी विनवणी केली व पाठपुरावाही करतात. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येत नाही. पालकांना आश्वासने मिळाली; पण सत्र संपत आले तरी गुरुजी मिळाले नाहीत. प्रशासनाला ग्रामीण भागातील शिक्षणाशी काही देणे-घेणे नाही, हे यावरुन स्पष्ट होते. एकीकडे केंद्र व राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी नवनवीन उपक्रम अंमलात आणले जातात. मात्र पहाडावरील शाळांची अवस्था अतिशय बिकट झाल्याचे वास्तव आहे. (तालुका प्रतिनिधी)