गंभीर! पाणी नसल्याने 'येथे' होत नाहीत तरुणांची लग्नं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2022 06:21 PM2022-05-14T18:21:11+5:302022-05-14T18:21:59+5:30

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगावात कुणी वधूपिता आपली मुलगी द्यायला तयार होत नाही. यामागे तिथे पाण्याचा दुष्काळ असणे हे एक प्रमख कारण सांगितले जाते.

Serious! Due to lack of water, young people do not get Bride here | गंभीर! पाणी नसल्याने 'येथे' होत नाहीत तरुणांची लग्नं

गंभीर! पाणी नसल्याने 'येथे' होत नाहीत तरुणांची लग्नं

googlenewsNext
ठळक मुद्दे नळ बंद, विहिरीतील पाणी अयोग्य

चंद्रपूर : गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगावपर्यंत आलेली जलवाहिनी फुटलेली आहे. अनेक भागांमध्ये नळच येत नाहीत. विहिरीतील पाणी पिण्यायोग्य नाही. नाल्यात खड्डा करून ग्रामस्थांना तहान भागवावी लागते. महिलांचा संपूर्ण दिवस पाणी गोळा करण्यात जातोय. त्यामुळे कोणीही इथल्या तरुणांना मुलगी द्यायला तयार नाही. याबाबत वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा करून पुन्हा कानाडोळा केला जातो, असा आरोप शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी एका प्रसिद्धपत्रकातून केला आहे.

गावात नळ नाही. टाकीत जाणाऱ्या पाण्याची पाईपलाईन ठिकठिकाणी फुटली असल्यामुळे शुद्धीकरण केलेल्या पाण्याचा जरी पुरवठा केला, तरी नळाला गढूळच पाणी येते. त्यामुळे गावातील लोकांना फिल्टर तसेच पाणी शुद्धीकरण मशीन बसवून जर पाणी शुद्ध करून दिले असते, तर लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मिळू शकते. पाण्याची समस्या सुटू शकते. पाणीटंचाईसोबतच या गावामध्ये सध्या अनेक सामाजिक प्रश्नसुद्धा निर्माण झालेले आहेत. पाणीच नसल्यामुळे या गावातल्या मुलांची लग्नं सध्या जुळत नाहीत. याचा पाठपुरावा सातत्याने इथले गावकरी करतात. मात्र पाठपुरावा करूनसुद्धा प्रशासनाकडून कोणत्याहीप्रकारचा दिलासा या गावकऱ्यांना मिळू शकला नाही. अशा परिस्थितीत तेथील महिलांना पाणी गोळा करावे लागते. त्यामुळे प्रशासनाने येथील गावकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत हा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी शिवसेना पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता प्रा. शिल्पा बोडखे यांनी केली आहे.

गोंडपिंपरी तालुक्यातील हेटी नांदगाव गावातील पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे. येथील महिलांना दिवसभर पाण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे. महिलांची ही अवस्था पाहून येथील तरुणांना लग्नासाठी मुली द्यायला कोणीही तयार होत नाही. म्हणूनच येथील पाणी प्रश्न तत्काळ सोडविण्याची गरज आहे.

- प्रा. शिल्पा बोडखे, पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक व विभागीय प्रवक्ता, शिवसेना

Web Title: Serious! Due to lack of water, young people do not get Bride here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.