वरोरा येथील निखील बाबुराव मडावी यांचा दीड महिन्याचा रियांश नावाचा मुलगा आहे. २१ डिसेंबर रोजी रियांशची आजी नाक साफ करीत असताना अचानक रियांशच्या नाकात सेप्टीक पिन गेली. त्याच वेळी रियांशने श्वास घेतल्याने पिन अन्ननलिकेत न जाता श्वास नलिकेत जावून अडकली. पिन श्वासनलिकेत अडकल्यामुळे रियांशला श्वास घेण्यास अडचण जावू लागली. त्यामुळे रियांशला त्रास जाणवू लागला. कुटुंबियांनी रियांशला वरोरा येथील बालरोग तज्ज्ञ देवतळे यांच्याकडे दाखवून एक्स रे काढला. डॉ. देवतळे यांनी कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. मनिष मुंधडा यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला.जीवनमृत्यूच्या संघर्षात डॉ. मुंधडा यांनी बाळाची परिस्थिती लक्षात घेत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डॉ. मुंधडा यांनी कुलशतापूर्वक आकस्मित शस्त्रक्रिया करत श्वासनलिकेतून सेप्टीक पिन बाहेर काढली. शस्त्रक्रियेच्यावेळी भूलतज्ज्ञ डॉ. सलीम तुकडी, बालरोग तज्ञ इरर्शाद शिवजी, डॉ. गोपाल मुंधडा उपस्थित होते. सेप्टीक पिक काढल्यानंतर रियांशची प्रकृती ठणठणीत झाली असून रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या तो चांगला खेळतो आहे. दरम्यान तोंडाव्दारे गळ्यात व पोटात अडकणारी कोणतीही लहान वस्तू मुलाजवळ देवू नये असे आवाहन डॉ. मनिष मुंधडा यांनी केले आहे.
दीड महिन्याच्या बालकाच्या श्वसननलिकेतून काढला सेप्टीक पिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:21 IST