लस न घेणाऱ्यांना घरी पाठविले; कोळसा उत्पादनाला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST2021-08-04T05:00:00+5:302021-08-04T05:00:47+5:30
१ व २ ऑगस्टला वेकोली व्यवस्थापनाने कोविड लस न घेतलेल्या सुमारे ३०० कामगारांना कामावर न घेता घरी परत पाठविले. कोळसा खाणीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम कोळसा उत्पादनावर दिसून आला. हे लक्षात येताच वेकोली व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली आहे. आता लसीकरणासाठी ११ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. इतकेच नव्हे, तर कामगारांकडून ११ ऑगस्टपर्यंत लस घेण्याबाबतचे वचनपत्र लिहून घेण्यात आले आहे.

लस न घेणाऱ्यांना घरी पाठविले; कोळसा उत्पादनाला फटका
राजेश रेवते
लोकमत न्यूज नेटवर्क
माजरी : वेकोली माजरीअंतर्गत येणाऱ्या कोळसा खाणीतील कामगार आणि अधिकाऱ्यांना कोविडची लस घेतल्याशिवाय खाणीत प्रवेश देणार नाही, असा फतवा वेकोली प्रबंधनाने काढला होता. १ ऑगस्टपासून त्याची अंमलबजावणीही केली. लस न घेतलेल्या शेकडो कामगारांना दोन दिवस कामावर न घेता घरी पाठविले. याचा फटका कोळसा उत्पादनावर होताच वेकोली व्यवस्थापनाने आपल्या फतव्याला ११ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
१ व २ ऑगस्टला वेकोली व्यवस्थापनाने कोविड लस न घेतलेल्या सुमारे ३०० कामगारांना कामावर न घेता घरी परत पाठविले. कोळसा खाणीत मनुष्यबळ कमी असल्यामुळे याचा थेट परिणाम कोळसा उत्पादनावर दिसून आला. हे लक्षात येताच वेकोली व्यवस्थापनाने नमती भूमिका घेतली आहे. आता लसीकरणासाठी ११ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. इतकेच नव्हे, तर कामगारांकडून ११ ऑगस्टपर्यंत लस घेण्याबाबतचे वचनपत्र लिहून घेण्यात आले आहे. या पत्रात कामगारांनी ११ ऑगस्टपूर्वी स्वतः लस घेऊन प्रमाणपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करावयाचे आहे.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक डोसचा तुटवडा
सहा दिवसांपासून जिल्ह्यात लसींचा तुटवडा आहे. कामगारांनी दिलेल्या वचनपत्रानुसार त्या कालावधीत लसीकरण होणार किंवा नाही, याबाबत संभ्रम आहे. ११ ऑगस्टपूर्वी वेकोली प्रबंधनाने कामगारांकरिता लसीकरणाकरिता विशेष व्यवस्था करावी, अशी मागणी कामगारांनी केली आहे.
वेकोलीच्या कामगार संघटनेने कामगारांना लस घेण्याबाबत मुदत मागितली होती. त्यांच्या मागणीनुसार वरिष्ठांच्या निर्देशानुसार कामगारांना मुभा देण्यात आली आहे. काही अटी व शर्ती घालून कामगारांकडून वचनपत्र घेऊन ११ ऑगस्टपर्यंत कामावर येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- अशोक जोशी,
कार्मिक प्रबंधक, वेकोली माजरी क्षेत्र.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करून कोलइंडियाने सर्व कामगार व अधिकाऱ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस बंधनकारक केली आहे. भीतीपोटी वेकोली प्रशासनाने हा निर्णय घेतला असावा. यात अनेक तांत्रिक अडचणीही आहेत. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात कुठेही लस उपलब्ध नाही. दोन दिवसांचे वेतन मिळावे, यासाठी संघटना वेकोली अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तोडगा काढणार आहे.
- जयनारायण पांडे,
प्रभारी, आयटक कामगार संघटना, माजरी क्षेत्र.