टी-१२ वाघिणीसह सेल्फी पार्इंट सेवेत
By Admin | Updated: July 14, 2017 00:16 IST2017-07-14T00:16:41+5:302017-07-14T00:16:41+5:30
वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे. ताडोबाच्या रुपाने हा जीवंत पराक्रम आमच्यासोबत आहे.

टी-१२ वाघिणीसह सेल्फी पार्इंट सेवेत
सुधीर मुनगंटीवार : वाघ हे पराक्रमाचे प्रतीक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे. ताडोबाच्या रुपाने हा जीवंत पराक्रम आमच्यासोबत आहे. त्यामुळे ताडोबाला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथील वाघ व उपलब्ध जीवसृष्टीतील अन्य प्राण्यांची ओळख, माहिती आणि महत्व पटवून देण्यासाठी त्यांच्या प्रतिकृती लवकरच उभारल्या जाईल. लोकप्रिय टी-१२ वाघीण व छाव्यांची प्रतिकृती त्यांची सुरुवात असल्याची माहिती राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
आज गुरुवारी सायंकाळी मोहुर्ली येथील ताडोबा प्रवेशव्दारावर त्यांनी ताडोबातील लोकप्रिय टी-१२ वाघीण व तिच्या छाव्यांच्या प्रतिकृतीचे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, वनकर्मचारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण केले.
ताडोबाची ओळख जागतिकस्तरावर होत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात पर्यटक पराक्रमाचे प्रतिक असणाऱ्या वाघाला बघायला ताडोबामध्ये येत आहेत. अशा पर्यटकांना वाघासोबतच अन्य प्राण्यांचीही माहिती या ठिकाणी उपलब्ध करावी, असा आपला मानस आहे. त्यादृष्टीने टी-१२ वाघीण व तिच्या छाव्यांची प्रतिकृती आज लोकार्पित केली. ही सुरुवात आहे. ताडोबा जंगल जैवविविध सृष्टीने नटले असल्यामुळे अन्य प्राण्यांची प्रतिकृतीदेखील उभारण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
यावेळी उपस्थित वन भागातील गावकऱ्यांशी ना. मुनगंटीवार यांनी संवाद साधला.
तसेच या भागात आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या गावातील लोकांना वनविभागातर्फे सानुग्रह निधीचे वाटपही त्यांनी केले. याशिवाय वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले मंगलदास चौधरी यांच्या पत्नीला सानुग्रह निधी म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी ताडोबा भागातील उर्वरित तीन गावांचे पुनर्वसन करताना सर्व शासकीय योजनांचा माणुसकीच्या दृष्टीने लाभ देण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केले. यावेळी मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, उपवनसंरक्षक किशोर मानकर यांनीही संबोधित केले.
कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, जि.प.सभापती ब्रिजभुषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, उपवनसरंक्षक किशोर मानकर, उपसंचालक जी.पी.नरवणे आणि नगरसेवक रामपाल सिंग उपस्थित होते.
बांबूवर आधारित उद्योगांना चालना
गेल्या वर्षी ‘चला माझ्या ताडोबाला’ या अभियानातंर्गत जिल्हयातील गरीब शाळकरी मुलांना ताडोबाची भेट घडवून आणली होती. सहा हजार ४६६ विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला. यापुढेही योजना सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. जंगलात व जंगल परिसरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या हाताला मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता अगरबत्ती उद्योग मोठया प्रमाणात सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले. अगरबत्ती उद्योगाला बांबूपासून काडया उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्याच प्रतिच्या बांबूची लागवड करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हयात बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्यात आले असून बांबूपासून विविध वस्तुंचे निर्माण या ठिकाणी होणार आहे. यामध्ये मोठया प्रमाणात या परिसरातील युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. रेल्वे विभागात आता मोठया प्रमाणात बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्रातील फर्निचर ठेवण्याबाबत आपली रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.