सात बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर

By Admin | Updated: July 30, 2015 01:06 IST2015-07-30T01:06:04+5:302015-07-30T01:06:04+5:30

पावसाचे दिवस असल्याने शेतकरी शेती कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करून सहकार विभागाने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची ...

Selection of seven market committees will be postponed | सात बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर

सात बाजार समित्यांची निवडणूक लांबणीवर

चंद्रपूर : पावसाचे दिवस असल्याने शेतकरी शेती कामात व्यस्त असल्याचे कारण पुढे करून सहकार विभागाने जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची आगामी निवडणूक सहा महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे. मात्र ही मुदतवाढ जिल्ह्यातील केवळ सात कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी लागू असून इतर पाच बाजार समित्यांची निवडणूक ही न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मधील कलम १४ (३) ए च्या तरतुदीनुसार टंचाई, दुष्काळ, पूर, आग किंवा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, पावसाळा यामुळे किंवा राज्य विधानमंडळाचा किंवा संसदेचा किंवा एखादा स्थानिक प्राधिकरणाचा कोणताही निवडणूक कार्यक्रम आणि कोणत्याही बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम एकाच वेळी आल्यामुळे किंवा राज्य शासनाच्या मते विशेष असेल अशा इतर कारणामुळे लोकहितास्तव बाजार समितींच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे अधिकार राज्य शासनाला आहेत.
त्यानुसार ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकासंदर्भात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने निवडणूका घेण्यासंदर्भात निश्चीत असे आदेश दिलेले आहेत व ज्या बाजार समित्यांचे निवडणुकीसंदर्भात जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन नियम १९६७ च्या नियम ४३ (१) खाली निवडणुकासंदर्भात आदेश काढले आहेत, अशा बाजार समित्या वगळून उर्वरित सर्व बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका आदेशाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
यात जिल्ह्यातील चंद्रपूर, राजुरा, कोरपना, नागभीड, चिमूर, भद्रावती, गोंडपिंपरी या या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या समावेश आहे. या बाजार समित्यांना आता सहा महिने म्हणजे २३ जानेवारी २०१६ पर्यंत मुदतवाढ मिळणार आहे.
तर ब्रह्मपुरी या बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून सावली, सिंदेवाही, वरोरा येथील बाजार समिती निवडणुकीसंदर्भात न्यायालयाने आदेश दिल्यामुळे या तीन बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. तर मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रकरण हे न्यायालयात पेंडीग आहे.
एकूणच ग्रामपंचायत निवडणूकीच्या धामधुमीत व शेती कामाच्या कालावधीत होणारी कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक आता दूर झाली आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Selection of seven market committees will be postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.