नवचेतना मिशनसाठी ५५ शाळांची निवड
By Admin | Updated: September 28, 2015 01:16 IST2015-09-28T01:16:07+5:302015-09-28T01:16:07+5:30
मिशन नवचेतनांतर्गत नागभीड तालुक्यातील ५५ शाळा श्रेणीत आणण्याचा निर्धार येथील शिक्षण विभागाने केला आहे.

नवचेतना मिशनसाठी ५५ शाळांची निवड
नागभीड : मिशन नवचेतनांतर्गत नागभीड तालुक्यातील ५५ शाळा श्रेणीत आणण्याचा निर्धार येथील शिक्षण विभागाने केला आहे. नागभीड तालुक्यात एकूण ११२ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत. यापैकी या प्रकल्पासाठी ५५ शाळांची निवड करण्यात आली आहे.
या उपक्रमात मुलांच्या सर्वांगीण शैक्षणिक प्रगतीसाठी खेळ व शिक्षण, मुलांचे वाचनालय, आदर्श चेतना शाळा, कौशल्य विकसन शिबिर, शिक्षकांसाठी नवरत्न स्पर्धा, स्वच्छ व सुंदर आदर्श शाळा तयार करणे, ई-लर्निंग व दत्तक शाळा योजना आदी योजना या शाळांत राबविण्याचा निर्धार शिक्षण विभागाने घेतला आहे.
यासाठी राजुली (बोंड), सावर्ला, टेकरी, पान्होळी, आकापूर, खडकी, डोंगरगाव, नागभीड (मुलांची) जीवनापूर, येनोली (माल) या शाळा या मिशनमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
नवचेतना मिशनसाठी ५५ शाळांची निवड करण्यात आली असली तरी पुरेसे अधिकारी या ठिकाणी कार्यरत नसल्याने शिक्षण विभागासमोर अनेक अडचणी येत आहेत. येथील गटशिक्षण अधिकाऱ्याचे पद दोन वर्षापासून रिक्त आहे. शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या येथे पाच जागा मंजूर असल्या तरी केवळ दोन शिक्षण विस्तार अधिकारी येथे कार्यरत असून एकाकडे गटशिक्षण अधिकाऱ्याचा प्रभार आहे. (तालुका प्रतिनिधी)