जलयुक्त शिवार परिसरासाठी २१८ गावांची निवड
By Admin | Updated: March 6, 2015 01:12 IST2015-03-06T01:12:15+5:302015-03-06T01:12:15+5:30
आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.

जलयुक्त शिवार परिसरासाठी २१८ गावांची निवड
चंद्रपूर : आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. येत्या डिसेंबर-२०१५ अखेर यंदा निवड झालेल्या २१८ गावांमध्ये काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती जिलहाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी जलयुक्त हे अभियान आहे. संपूर्ण राज्यामध्ये ते राबविले जात असून चंद्रपूर जिल्ह्यातील २१८ गावांची निवड पहिल्या टप्प्यात झाली आहे. त्यापैकी ६६ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे.
गावांची निवड करताना टंचाईग्रस्तता, आणेवारीतील घट आणि नागरिकांची मागणी या तीन बाबी लक्षात घेतल्याचे सांगून ते म्हणाले, ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबवायची असून आगामी पाच वर्षांचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी निधीचीही तरतुद झाली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक आमदारांकडून ५० लाख रूपयांचा निधी या कामी दिला जाणार असून त्यातून तीन ते चार कोटी रूपये मिळणार आहेत.
या योजनेमध्ये सरकारच्या आठ यंत्रणा सहभागी असून त्यात जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना, सामाजिक वनिकरण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे.
मामा तलाव, सिमेंट फ्लग बंधारे आणि शेततळ्यांच्या निर्मीतीचेही उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने डोळयापुढे ठेवले आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत एक हजार शेततळयांची निर्मीती होणार असून ५५४ माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. १३८ सिमेंट फ्लग बंधाऱ्यांचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने आखले होते. मात्र ९८ बंधारे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याने या कामाचे नियोजन झाले आहे.
चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना व जीवती या पाच तालुक्यांखेरिज अन्य १० तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात झाली आहे. यात मूल तालुका आघाडीवर आहे. तेथील १९ गावांमध्ये ३२ पैकी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ पोंभुर्णा तालुक्याचा क्रमांक आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी संजय दैने, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. अदमाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)