वीज केंद्रातून लाकूड चोरुन नेणारा ट्रक जप्त
By Admin | Updated: February 9, 2015 23:10 IST2015-02-09T23:10:30+5:302015-02-09T23:10:30+5:30
वीज केंद्र परिसरातून अवैधरित्या झाडांची कत्तल करुन ट्रकमध्ये लाकूड चोरुन नेत असताना, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रक पकडला. याबाबत दुर्गापूर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली

वीज केंद्रातून लाकूड चोरुन नेणारा ट्रक जप्त
दुर्गापूर : वीज केंद्र परिसरातून अवैधरित्या झाडांची कत्तल करुन ट्रकमध्ये लाकूड चोरुन नेत असताना, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रक पकडला. याबाबत दुर्गापूर पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली असून सदर घटना रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करुन ट्रक चालकाला अटक केली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. ट्रकमध्ये २५ हजार किंमतीचे १० टन लाकूड आहे. चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. सर्वत्र हिरवेगार झाडे असल्याने येथे उन्हाळ्यातही गारवा असतो. मात्र अलिकडे येथील मोठमोठी वृक्षे चक्क बुंध्यापासून तोडून चोरुन नेल्या जात आहेत. त्यामुळे येथील अर्धेअधीक वृक्ष लंपास झाली.
रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक क्र. एम.एच. ३१ एम- ४५५० वीज केंद्राच्या परिसरातून गेट पास वीना जात असताना, सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ट्रक चालक रमेश ऊर्फ बाबा रामदास नन्नावरे (४०) रा. बाबुपेठ वॉर्ड याचा ट्रक अडवून चौकशी केली. त्यात त्यांच्याकडे वीज केंद्रातून सामान बाहेर घेऊन जाण्याचा गेटपास नसल्याचे आढळून आले. वीज केंद्राच्या व्यवस्थापनाने याबाबत दुर्गापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. यावरुन पोलिसांनी चालकाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला व त्यास अटक करुन ट्रक जप्त केला. (वार्ताहर)