शेतकऱ्यांना हवी एकरी ३० हजारांची मदत
By Admin | Updated: March 6, 2015 01:16 IST2015-03-06T01:16:41+5:302015-03-06T01:16:41+5:30
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे.

शेतकऱ्यांना हवी एकरी ३० हजारांची मदत
चंद्रपूर : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून एकरी ३० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी केली आहे.
यंदाच्या हंगामात सुरुवातीला उशिरा हजेरी लावल्याने आणि ऐन पीक कापण्याच्या वेळेस झालेल्या अति पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अल्पसे उत्पादन आले आहे. त्यातही शासनाकडून योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संकटावर मात करीत रब्बी पीक चांगले येईल, या आशेत बळीराजा होता. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे चना, गहू, ज्वारी, फळबाग या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वच काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३० हजार रुपये आर्थिक मदत आणि जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुरेश रामगुंडे यांच्यासह डी.के. आरीकर, संजय पिंंपळकर, रवी शर्मा आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)