आठ लाखांच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 00:42 IST2016-06-08T00:42:31+5:302016-06-08T00:42:31+5:30
गेल्या साडेतीन वर्षांपासून नांदा येथील अंगणवाडी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वारंवार अपात्रतेच्या कार्यवाही सापडलेल्या ...

आठ लाखांच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब
नांदा येथील अंगणवाडीचे बांधकाम: सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संगनमतातून गैरप्रकार
चंद्रपूर : गेल्या साडेतीन वर्षांपासून नांदा येथील अंगणवाडी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वारंवार अपात्रतेच्या कार्यवाही सापडलेल्या सरपंच पूजा मडावी, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी भडके यांच्याकडून सात लाख ८६ हजार १९५ रुपये वसूल करून तिघांवरही फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य होईल, असा अभिप्राय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात दिला आहे.
असे असले तरी हात दिवस उलटूनही जिल्हा परीषद प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ३९/१ ची कारवाई नियमानुसार न केल्याने राज्यमंत्र्याच्या अपात्रतेच्या आदेशाला नागपूर उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढून नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तब्बल साडेतीन वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असताना सरपंचपदाचा कार्यकाळ संपत आला तरी जनतेच्या लाखो रुपयांचा हिशेब जनतेला मिळाला नाही. भ्रष्टाचार सिद्ध झाला असताना अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले असल्याचा आरोप तक्रारकर्ते हारून सिद्दिकी यांनी केला आहे.
अंगणवाडी बांधकामासाठी वितरीत करण्यात आलेल्या निधीपैकी अफरातफर करण्यात आलेल्या रकमेपैकी सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी यांच्याकडून तीन लाख ९३ हजार ९७ रुपये, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार यांच्याकडून एक लाख ६३ हजार ५५६ व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी भडके यांच्याकडून २ लाख २९ हजार ५४२ अशी एकूण ७ लाख ८६ हजार १९५ रुपये वसूल करण्यात येणार आहे.
तसेच तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भडके यांची विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे चौकशी अभिप्रायात म्हटले आहे.
यामुळे संबंधित पदाधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता बळावत असली तरी प्रशासकीय पातळीवर मात्र कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)
१० जूनला मुंडण आंदोलन
लहान मुलांसाठी अंगणवाडीचे तब्बल आठ लाख रुपये घशात घालून बालकांच्या हक्काची शाळा हिरावून घेणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नांदा ग्रामवासियांवर अन्याय केला आहे. सतत साडेतीन वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवता-उठवता सरपंचपदाचा कार्यकाल संपला तरी कारवाई न झाल्याने दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व भ्रष्टाचार करून हडलेल्या निधीची वसुली करावी, अंगणवाड्यांचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी येत्या १० जूनला जिल्हा परिषदेसमोर नांदा गावातील नागरिक मुंडण आंदोलन करणार असल्याबाबत निवेदन दिल्याचे तक्रारकर्ते हारून सिद्दिकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राजकीय दबावातून कारवाई
सदर चौकशी ही राजकीय दबावातून करण्यात आली असून मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. निवडणुकीच्या तोंडावर मला फसविण्याचा प्रयत्न होत आहे.
-पूजा मडावी, सरपंच, नांदा