बियाणांची उगवण क्षमता तपासावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:01 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:01:37+5:30
मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनची गुणवत्ता खालावल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. घरात असलेल्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे, सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे, गोनपाटाचे सहा चौकोनी तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावेत, एक तुकडा जमिनीवर पसरावा.

बियाणांची उगवण क्षमता तपासावी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लॉकडाऊन असतानाही सर्व दु:ख विसरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. तत्पूवी शेतकऱ्यांनी पेरणीसाठी वापरण्यात येणाºया बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, विशेषत: घरातील बियाणांचाच अधिक वापर करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
मागील वर्षी अतिवृष्टी झाल्याने सोयाबीनची गुणवत्ता खालावल्याची शक्यता आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या बियाण्याची उगवण क्षमता तपासून घेणे गरजेचे आहे. घरात असलेल्या सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यात खोलवर हात घालून मूठभर धान्य बाहेर काढावे, सर्व पोत्यातील काढलेले धान्य एकत्र करून घ्यावे, गोनपाटाचे सहा चौकोनी तुकडे करून स्वच्छ धुऊन घ्यावेत, एक तुकडा जमिनीवर पसरावा. पोत्यामधून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे दीड ते दोन सेंटीमीटर अंतरावर दहा-दहा च्या रांगेत गोणपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावे, अशाप्रकारे १०० दाण्यांचे तीन नमुने तयार करावेत. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओला करावा, बियाण्यावर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरून पुन्हा चांगले पाणी शिंपडावे. गोणपाटाच्या तुकड्यांची बियाण्यासकट गोल गुंडाळी करून थंड ठिकाणी सावलीत ठेवावे, त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. सहा ते सात दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरवून उघडा, चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. तिन्ही गुंडाळ्याची सरासरी काढून १०० दाण्यापेक्षा ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे जर चांगले कोंब आलेले असतील तर आपले बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे, शिफारशीनुसार ते आपल्याला पेरणीसाठी वापरता येते. अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
कमी खर्चात होणार शेती
कोरोनामुळे शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी घरचे बियाणे उगवण क्षमता तपासून परेणी करण्यास वापरावे. तसेच बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल.