सुरक्षेविनाच सुरू आहे मुलींच्या वसतिगृहाचा कारभार
By Admin | Updated: March 18, 2017 00:42 IST2017-03-18T00:42:57+5:302017-03-18T00:42:57+5:30
गडचांदूर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल मुख्यालयी राहत नसल्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सुरक्षेविनाच सुरू आहे मुलींच्या वसतिगृहाचा कारभार
गृहपाल प्रभारी: विविध समस्यांकडेही प्रशासनाचे दुर्लक्ष
कोरपना : गडचांदूर येथील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील गृहपाल मुख्यालयी राहत नसल्यामुळे विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून प्रकल्प अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत गडचांदूर येथे आदिवासी मुलींचे वसतीगृह चालविण्यात येते. यामध्ये आठवी ते बीए अंतिम वर्षापर्यंत शिक्षण घेणाऱ्या ५५ विद्यार्थिनी राहतात. वसतिगृह विद्यार्थिनीची देखभाल तसेच सुरक्षा करण्यासाठी गृहपाल आणि महिला शिपाईची नियुक्ती केली गेली. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून गृहपालाचे पद रिक्त आहे. याचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला. प्रभारी गृहपाल हे ९० किलोमीटरहून ये-जा करतात. ते वसतिगृहात येऊन मुलींच्या अडचणींबाबत विचारणा करीत नाहीत. कार्यालयात येणे आणि परस्पर निघून जाणे हा त्यांचा नित्याचा दिनक्रम ठरला आहे. यामुळे वसतिगृहात अनेक समस्यांनी घर केले आहे. मात्र, याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. ग्रामीण भागातील आदिवासी मुलींना शिक्षणाची समान संधी मिळावी, या उद्देशातून आदिवासी वसतिगृह चालविले जाते. मात्र, प्रशासन आणि अव्यवस्थापनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनींची सुरक्षाच धोक्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
वेळेपूर्वीच निघून जातात कर्मचारी
आदिवासी मुलीच्या वसतिगृहात रात्रीच्या वेळी गृहपाल तसेच शिपाई यांची उपस्थिती असणे गरजेचे आहे. मात्र, त्यापूर्वीच हे दोघेही निघून जातात. त्यामुळे नशिबाच्या भरवशावरच सुरक्षेचा खेळ सध्या सुरु आहे.
विद्यावेतनही मिळाले नाही
आदिवासी प्रकल्प कार्यालयाकडून विद्यार्थिनीना प्रत्येकी ६०० रुपये एवढे विद्यावेतन दिले जाते. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या मुलीना जून २०१६ पासून विद्यावेतन मिळालेले नाही. त्यामुळे मुलीसमोर आर्थिक संकटही उभे आहे.