चौकशी लांबविण्यासाठी सचिवच बदलला

By Admin | Updated: February 5, 2016 00:47 IST2016-02-05T00:47:36+5:302016-02-05T00:47:36+5:30

जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वी लोखंडी बंडी गैरव्यवहार प्रकरण चांगलेच गाजले. आमसभेतही या प्रकरणावरून गदारोळ झाला.

Secretary to change the query changed | चौकशी लांबविण्यासाठी सचिवच बदलला

चौकशी लांबविण्यासाठी सचिवच बदलला

लोखंडी बंडी गैरव्यवहार : जिल्हा परिषद अध्यक्षांची नवी शक्कल
चंद्रपूर : जिल्हा परिषदेत काही दिवसांपूर्वी लोखंडी बंडी गैरव्यवहार प्रकरण चांगलेच गाजले. आमसभेतही या प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यानंतर या गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली. मात्र ही चौकशी लांबविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी अधिकार नसताना चौकशी समितीचा सचिव बदलून नव्या सचिवाची नेमणूक करीत नवी शक्कल लढविल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतीश वारजूकर यांनी केला आहे. यामुळे बैलबंडीच्या प्रकरणावरून पुन्हा जिल्हा परिषद वर्तुळात वादळ उठले आहे.
चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या कृषी व समाज कल्याण विभागातर्फे शेतकऱ्यांना पुरवठा करण्यात आलेल्या लोखंडी बंडी खरेदीमध्ये गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य अविनाश जाधव यांनी सभागृहात केला. त्यावर सखोल चौकशीची मागणी सभागृहात झाल्यानंतर चौकशी समिती व सचिव नेमण्याचे अधिकारी अध्यक्षांना देण्यात आले होते. त्याप्रमाणे अध्यक्ष संध्या गुरुनुले यांनी उपाध्यक्ष कल्पना बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करुन सहारे यांना चौकशी समितीचे सचिव नेमण्यात आले. प्रत्यक्षात चौकशी समितीला चौकशीसाठी आवश्यक सुविधा व सहकार्य करण्याची मागणी असताना सहकार्य न करता सचिव सहारे यांना चौकशी समितीवरुन बदलून उपमुख्य कार्यकारी अधिकारी राठोड यांची चौकशी समितीचे नवीन सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
यावर वारजुकर यांनी आक्षेप घेतला आहे. सभागृहाने चौकशी समिती नेमण्याचे अधिकार अध्यक्षांना दिले होते. त्यात बदल करण्याचे नाही. तसेच बदल करायचा असल्यास तशी सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे, असे वारजूकर यांनी म्हटले आहे. सुरुवातीच्या काळात चौकशी व्हावी, याकरिता आग्रही असणाऱ्या संध्या गुरुनुले यांनी अचानक आपला पावित्रा बदलून चौकशी कशी लांबविता येईल, याकडे लक्ष देणे सुरू केल्याचा आरोप केला आहे. ऐनवेळी सचिव बदलल्याने चौकशी व्यवहार अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
चौकशी समितीचे सचिव यांनी प्रशासनाकडे सदस्यांना चौकशी स्थळी नेण्याकरिता वाहनाची सुविधा तसेच बंडीचे वजन करण्यासाठी किलोकाटा व अन्य बाबींची मागणी केली असता त्याकडे लक्ष न देता सचिवालाच बदलण्याची कार्यवाही केली आहे. प्रशासनाकडून सहारे यांना कोणत्याच सुविधा पुरविल्या नाही, ही वस्तुस्थिती असून सहारे यांना जि.प. सर्वसाधारण समितीच्या निर्देशानुसार नियुक्त केले आहे. त्यांना स्वत:हून दिलेले काम नाकारण्याचा अधिकार नाही, असे असताना त्यांनी काम नाकारुन आदेशाची अहवेलनाच केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कामकाजात कुचराई केल्याबद्दल आयुक्तांकडे तक्रार करण्यात येईल, असे सतिश वारजूकर यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Secretary to change the query changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.