प्राथमिक शिक्षकांचा शिक्षण विभागाला घेराव
By Admin | Updated: March 31, 2016 01:19 IST2016-03-31T01:19:51+5:302016-03-31T01:19:51+5:30
मार्च महिना संपत आला तरी येथील शिक्षण विभागाने शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन काढले नाही.

प्राथमिक शिक्षकांचा शिक्षण विभागाला घेराव
नागभीड : मार्च महिना संपत आला तरी येथील शिक्षण विभागाने शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे वेतन काढले नाही. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षण विभागालाच घेराव घातला. यामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ खळबळ माजली.
येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत शिक्षकांचे वेतनबील तयार करण्यासाठी सैताने नामक लिपिकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी तो गेल्या तीन दिवसांपासून अनधिकृत गैरहजर असल्याचे समजते. दरम्यानच्या काळात येथील शिक्षक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षण विभागात जाऊन चौकशी केली असता त्यांना समाधानकारक उत्तरे मिळत नव्हती. एवढेच नाही तर येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांना वारंवार सूचना देवूनही तेसुद्धा शिक्षकांच्या या समस्येकडे लक्ष देत नव्हते.
यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी पंचायत समितीतील शिक्षण विभागाला घेराव घालण्याच्या निर्णय घेतला.
अखिल नागभीड तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वात हे सर्व शिक्षक आज बुधवारी एकत्र आले आणि गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या समोरच ठिय्या आंदोलन करुन गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला घेराव घातला.
यावेळी शिक्षक संघाचे केशव कोल्हे, गजेंद्र जवंजाळ, प्रभाकर करंबे, कृष्णा बहेकर, गिरीधर नगरे, देवानंद तुळकाने, राजकुमार एकवनकर, आकाश कुरजेकर, संतोष साखरकर यांच्यासह शेकडो शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)