अवैध दारुप्रकरणी माजी नगराध्यक्षाला दुसऱ्यांदा अटक
By Admin | Updated: April 13, 2016 01:21 IST2016-04-13T01:21:50+5:302016-04-13T01:21:50+5:30
नगर परिषद वरोराचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी नगराध्यक्षाला अवैध दारु बाळगल्या प्रकरणी १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास

अवैध दारुप्रकरणी माजी नगराध्यक्षाला दुसऱ्यांदा अटक
डीबी पथकाची कारवाई : वरोरा शहरातील प्रकार
वरोरा : नगर परिषद वरोराचे अध्यक्षपद भूषविलेल्या माजी नगराध्यक्षाला अवैध दारु बाळगल्या प्रकरणी १२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास वरोरा पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अटक केली. काही दिवसापूर्वी याच माजी नगराध्यक्षाला त्याच्या एका सहकाऱ्यासह अवैध दारु बाळगल्याप्रकरणी वरोरा पोलिसांनी अटक केली होती, हे विशेष!
मेघश्याम दिगांबर सिडाम असे अटक करण्यात आलेल्या माजी नगराध्यक्षाचे नाव आहे. वरोरा शहरातील अंबादेवी वॉर्डातील रहिवासी असलेले मेघश्याम सिडाम यांनी काही काळ वरोरा पालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. अंबादेवी वॉर्डातील आपल्या निवासस्थानी देशी व विदेशी मद्याची विक्री मेघश्याम सिडाम करीत असल्याची गुप्त माहिती वरोरा पोलिसांच्या डिबी पथकास मिळाली. यावरुन ३ एप्रिल रोजी डीबी पथकाच्या सदस्यांनी धाड टाकून मेघश्याम सिडाम व त्याच्या एक सहकाऱ्यास देशी विदेशी मद्याच्या बॉटलसह ताब्यात घेऊन अटक केली होती.
न्यायालयाने दोघांनाही दुसऱ्या दिवशी जामीन मंजूर केला होता. सुटका झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच मेघश्याम सिडाम याने अवैधरित्या दारु विक्री करण्यासाठी देशी दारुच्या बॉटल आणून घरानजीकच्या झाडामध्ये लपवून ठेवल्या होत्या व त्या ग्राहकांना विकत होता, याची माहिती वरोरा पोलिसांच्या डीबी पथकास मिळाली.
१२ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली, असता देशी दारूच्या २५ बॉटल आढळून आल्याने माजी नगराध्यक्ष मेघश्याम सिडाम यास मुद्दे मालासह ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध दारु प्रकरणी माजी नगराध्यक्षाला आठ दिवसात दोनदा पोलिसांच्या डीबी पथकाने ताब्यात घेतल्याने वरोरा शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईने अवैध दारु विक्रेते तूर्तास हादरले असल्याचे दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)