शाळेतील माहिती तंत्रज्ञान पडले अडगळीत
By Admin | Updated: January 28, 2015 23:13 IST2015-01-28T23:13:05+5:302015-01-28T23:13:05+5:30
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरी मुलांसारखे शैक्षणिक ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, जगाची माहिती खेड्यातील शाळेत बघता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा

शाळेतील माहिती तंत्रज्ञान पडले अडगळीत
शंकर चव्हाण - जिवती
ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना शहरी मुलांसारखे शैक्षणिक ज्ञानाबरोबर संगणकीय ज्ञान अवगत व्हावे, जगाची माहिती खेड्यातील शाळेत बघता यावी, यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला संगणक संच पुरविण्यात आले. मात्र संगणक पुरविणाऱ्या यंत्रणेकडून संगणकाचे संच हलक्या दर्जाचे व कमी किंमतीचे पुरविण्यात आल्याने अल्पश: कालावधीत बहुतांश शाळेतील संगणक बंद पडले आहेत. अनेक शाळांतील विद्युत पुरवठाच खंडीत असल्याने संगणक बंद स्वरूपात असून विद्यार्थ्यांना संगणक शिकविण्यास अडचण निर्माण होत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते. परिणामी संगणकीय युगातही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे संगणक शिकण्याचे स्वप्न अधुरे राहत असल्याची बाब ‘लोकमत’ने काही शाळांना भेट दिल्यानंतर उघडकीस आली.
देशातील प्रत्येक क्षेत्रात आॅनलाईनचे जाळे पसरविण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात आहे. शहरात प्रत्येकाला आॅनलाईनचे वेड लागले आहे. जगाची माहिती काही क्षणात पाहता येते. मात्र ग्रामीण भागातील शाळेत हलक्या दर्जाचे संगणक पुरवून त्यांची थट्टा केली जात आहे. बंद पडलेले संगणक आणि खंडीत विद्युत पुरवठा यामुळे शालेय विद्यार्थी आज संगणक शिकण्यापासून वंचित आहेत. प्रस्तुत प्रतिनिधीने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला असता, संगणक शिकण्याची आवड आहे, मात्र शाळेत विद्युत पुरवठाच नाही मग आम्ही संगणक शिकणार कसे? असा सवाल विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित केला.
शाळा हे देशाची भावी पिढी सक्षम व सुदृढ करण्याचे एक माध्यम व ज्ञानमंदीर आहे. या मंदिरातून जसे विद्यार्थी घडवाल, तसेच ते घडतात. मात्र घडविण्याचे साधनच बंद असले की विद्यार्थी घडविणे कठीण होते. हिच परिस्थिती सध्या जिवती तालुक्यातील शाळांमध्ये निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील नागरिक अज्ञानी व आर्थिक कमकुवत असल्याने त्यांच्याकडे आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत शिकविण्याची त्यांची कुवत नाही. जेथे मुलगा शिकतो, तेथे ते कधी फिरकुनही पाहत नाहीत. माझा मुलगा शिकतो की नाही, त्यांना लिहिता वाचता येते का, हे विचारण्याची अशिक्षित पालक धाडस करीत नाही. म्हणूनच की काय शिक्षक आपली मनमानी चालवितो कधीही शाळेत जाणे कधीही येणे ही त्यांची सवय झाली आहे. अधिकारी महिन्यातून एकदा येतात. शाळा भेटी करतात आणि निघून जातात. पण शाळेतील विद्यार्थी शिकतो काय, त्यांना शिक्षण व्यवस्थीत व योग्य दिल्या जाते काय? अप्रगत प्रगत विद्यार्थी आहेत का? याची कधीही विचारपूस होत नाही.