जनप्रबोधनासाठी रंगणार शाळेच्या भिंती
By Admin | Updated: January 28, 2015 23:12 IST2015-01-28T23:12:00+5:302015-01-28T23:12:00+5:30
जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांमुळे अनेकवेळा मानवांना आपला जीव गमवावा लागतो.अशा घटनांवर आळा बसावा, नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांबाबत

जनप्रबोधनासाठी रंगणार शाळेच्या भिंती
साईनाथ कुचनकार - चंद्रपूर
जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्षाच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनांमुळे अनेकवेळा मानवांना आपला जीव गमवावा लागतो.अशा घटनांवर आळा बसावा, नागरिकांमध्ये वन्यप्राण्यांबाबत आपुलकी निर्माण व्हावी सोबतच जंगलात जाण्यापूर्वी कोणती दक्षता घ्यावी यासाठी वनविभागाने पाऊल उचलले आहे. आता गावागावांतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या भिंतीवर तैलचित्राद्वारे माहिती देण्यात येणार आहे.
औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वनांचे प्रमाण मोठे आहे. मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या लोकसंख्येमुळे वन्यप्राण्यांच्या अधिवासात नागरिकांनी आपले बस्तान सुरु केले आहे. जिल्ह्यातील अनेक गावे जंगलाशेजारी असल्याने प्रत्येकवेळी मानवांना जंगलात जावे लागते. मोहफुल वेचनी, इंधनासाठी लाकूड, जनावरांना चरण्यासाठी जंगलात न्यावे लागते. अशावेळी वन्यप्राणी हल्ला करतात. त्यामुळे अनेकवेळा जखमी व्हावे लागते. कधीकाळी जीवही गमवावा लागतो. अशावेळी नागरिकांनी आपली सुरक्षा कशी करावी, जंगलात जाण्यापूर्वी काय करावे, कोणत्या परिसरात जावे, जंगलात जाण्यापूर्वी परवानगी कशी घ्यावी, शिकारींच्या घटनांवर आळा घालण्यासाठी सामान्य नागरिक म्हणून आपले असलेले कर्तव्य सोबतच जंगली प्राण्यांना वाचविण्यासाठी काय केले पाहिजे यावर तैलचित्राद्वारे माहिती देण्यात येणार आहे. ही माहिती गावागावांतील जिल्हा परिषद शाळांच्या भिंतीवर रंगविण्यात येणार आहे. चंद्रपूर वनविभागांतर्गत चार विभाग पाडण्यात आले आहे. यातील ब्रह्मपुरी, मध्यचांदा, चंद्रपूर वनविभाग तसेच ताडोबा असे आहे. ताडोबाअंतर्गत कोअर आणि बफर झोन क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये अनेकवेळा वन्यप्राण्यांनी हल्ले केले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळांच्या भिंतीवर तैलचित्राद्वारे वनविभाग ग्रामस्थांना माहिती देणार आहे. यासाठी येथील मध्यचांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे.