शाळा बंद करून शिक्षकांसह मुख्याध्यापक फरार

By Admin | Updated: June 20, 2015 02:00 IST2015-06-20T02:00:56+5:302015-06-20T02:00:56+5:30

कारणे दाखवा नोटीसबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेच्या पतीला मुख्याध्यापकासह शिक्षकांनी बेदम मारहाण केली.

School principal absconding with teachers | शाळा बंद करून शिक्षकांसह मुख्याध्यापक फरार

शाळा बंद करून शिक्षकांसह मुख्याध्यापक फरार

दुर्गापूर : कारणे दाखवा नोटीसबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शिक्षिकेच्या पतीला मुख्याध्यापकासह शिक्षकांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल होताच शाळा बंद करून शिक्षकांसह मुख्याध्यापक फरार झाला आहे. दुर्गापूर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
तुकूम येथील मातोश्री विद्यालयात हिरा झांबड ही शिक्षिका कार्यरत आहे. येथील मुख्याध्यापकांनी १६ जूनपासून शिक्षकांकरिता वर्ग सुरू केले. काही महत्त्वाच्या कामाने शिक्षिका या वर्गांना गैरहजर होती. या क्षुल्लक कारणावरुन मुख्याध्यापक सूर्यकांत खनके यांनी शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली.
१८ जूनला ती दुपारी १२ वाजता तिचे पती संजय झांबड यांच्यासह नोटीसबाबत चर्चा करण्याकरिता मुख्याध्यापकांच्या कार्यालयात गेले. येथे त्यांची आपसात शाब्दिक चकमक झाली. यात मुख्याध्यापकासह शिक्षकांनी शिक्षिकेसमक्ष पतीला बेदम मारहाण करून रक्तबंबाळ केल्याची घटना शुक्रवारी घडली.
याबाबत शिक्षिकेने दुर्गापूर पोलीस ठाणे गाठून प्रकरणाची तक्रार ठाण्यात नोंदविली. त्यानंतर रात्री पोलिसांनी मुख्याध्यापकावर १४३, १४७, १४९, ५०४, ५०६, ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल होताच मातोश्री विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत खनके हे शिक्षकांसह फरार झाले आहेत. दुर्गापूर पोलीस त्यांच्या मागावर असून येथील मुख्याध्यापक अटकपूर्व जामीनकरिता धडपड करीत असल्याची माहिती आहे.
मात्र दुर्गापूर पोलिसांनी त्यांना हुडकून काढण्यासाठी आपली एक चमू त्यांच्या शोधात रवाना केली आहे. वृत्त लिहिस्तोवर कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. (वार्ताहर)

Web Title: School principal absconding with teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.