‘त्या’ दिवशी शाळा उघडलीच नाही
By Admin | Updated: August 5, 2014 23:41 IST2014-08-05T23:41:11+5:302014-08-05T23:41:11+5:30
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ आणि पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या मौजा झरी (पेठ) या आदिवासी बहूल गावातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आल्यापावली परत जावे लागले.

‘त्या’ दिवशी शाळा उघडलीच नाही
चिचपल्ली : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ आणि पंचायत समिती चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या मौजा झरी (पेठ) या आदिवासी बहूल गावातील शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना आल्यापावली परत जावे लागले. सदर प्रतिनिधीने नागपंचमीच्यादिवशी सदर गावाला भेट दिली असता हा प्रकार निदर्शनास आला.
याबाबत गावकऱ्यांना विचारणा केली असता गावकरी म्हणाले, शिक्षक लोकांची येथे मनमर्जी चालते. केव्हाही या आणि केव्हाही जा. शाळा उघडण्याची वेळ कधी ठरलेली नाही. शाळा कधीही उघडली जाते, कधीही बंद केली जाते. असा त्यांचा नित्यक्रम असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होत आहे.
मौजा झरी (पेठ) येथे जिल्हा परिषदेचे १ ते ४ वर्ग असून दोन शिक्षकी शाळा आहे. एकूण सहा विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करते. संतोष आत्राम या शाळेतील मुख्याध्यापक असून एक सहायक शिक्षिका आहे. दोन्ही शिक्षक झरी या गावी आपल्या सोयीच्या ठिकाणाहून ये-जा करतात. मात्र दिवशी शिक्षकांनी शाळा उघडण्याचे सौजन्य दाखवले नाही. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना शाळा उघडण्याचा विसर कसा काय पडला, असा प्रश्न पालक भैय्याजी आत्राम यांच्यासह शाळा समितीने उपस्थित केला आहे. (वार्ताहर)