ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात मधुमेह औषधांचा तुटवडा
By Admin | Updated: April 1, 2015 01:05 IST2015-04-01T01:05:39+5:302015-04-01T01:05:39+5:30
ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापासून मधुमेह आजारांच्या औषधांचा तुटवडा असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणीचा व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात मधुमेह औषधांचा तुटवडा
ब्रह्मपुरी : ग्रामीण रुग्णालयात गेल्या दोन महिन्यापासून मधुमेह आजारांच्या औषधांचा तुटवडा असल्याने नागरिकांना आर्थिक अडचणीचा व गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण रुग्णालयात गेल्या सहा महिन्यापासून प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारभार सुरू आहे. तालुक्यातील सर्वात मोठे व प्रमुख असे हे सरकारी रुग्णालय आहे. बरेच खेड्यापाड्यातील नागरिक व शहरातीलही नागरिक विविध आजारांवर उपचार घेण्यासाठी येथे येतात परंतु काही आजारांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर व उपकरणांची कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांची चांगलीच गैरसोय होत आहे. अश्यात हे प्रमुख रुग्णालय प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर सोडले असल्याने काही बाबतीत अनियमतता असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे. तालुक्यात मधुमेह या आजाराच्या रुग्णांची संख्या मोठी आहे. जवळजवळ ७० टक्के लोकांना मधूमेह आजार जडला आहे. यातील श्रीमंत वर्ग निरनिराळ्या खासगी डॉक्टरांकडून औषधोपचार करून घेत असतात. परंतु मध्यम, गरीब वर्गाला औषधोउपचारासाठी ग्रामीण रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागते. या आजाराची बाधा झालेले वयोवृद्ध नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. यातील काही पेन्शनधारक आहेत. काही निराधार आहेत. त्यांच्यासमोर आर्थिक प्रश्न निर्माण होत असतो. सरकारी योजने अंतर्गत अशा आजारावर नि:शुल्क औषधी मिळायची. ती आता दोन महिन्यांपासून दवाखान्यात पोहचली नसल्याने रुग्णांना औषधी मिळणे कठीण झाले आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांचे हाल होत आहेत. हातात पैसा नाही व औषधेही मिळत नाही अशा वेळी जीवन कसे जगावे, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे ताबडतोब मधुमेह आजाराच्या रुग्णांसाठी येथे औषधोपचाराची व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)