एस.सी. प्रवर्गाचा टक्का घसरला
By Admin | Updated: February 1, 2015 22:53 IST2015-02-01T22:53:32+5:302015-02-01T22:53:32+5:30
आॅगस्ट २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणात २०१० च्या तुलनेत अनुसुचित जाती या प्रवर्गातील

एस.सी. प्रवर्गाचा टक्का घसरला
नागभीड : आॅगस्ट २०१५ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या आरक्षणात २०१० च्या तुलनेत अनुसुचित जाती या प्रवर्गातील प्रभाग सदस्यांचा टक्का घसरला आहे.
नागभीड तालुक्यात एकूण ६५ ग्रामपंचायती आहेत. यातील ५० ग्रामपंचायतीची सार्वत्रीक निवडणूक येत्या आॅगस्ट महिन्यात होऊ घातली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार येथील तहसीलदारांनी या ५० ग्रामपंचायतीचे प्रभाग निहाय आरक्षण नुकतेच जाहीर केले. यानुसार या ५० ग्रामपंचायतीमधून केवळ अनुसुचित जाती प्रवर्गातील केवळ ५१ सदस्य निवडल्या जाणार आहेत.
नागभीड ग्रा.पं. मध्ये २०१० च्या निवडणुकीपर्यंत अनुसूचित जाती प्रवर्गातील दोन सदस्य सातत्याने निवडले जायचे. पण नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणात केवळ एकच आरक्षण निघाले आहे. २००२ च्या निवडणुकीपर्यंत मिंथूर येथे या प्रवर्गात एका सदस्याला संधी मिळायची. पण २००७ पासून ही संधी बाद झाली आहे. अशीच परिस्थिती काही गावात उद्भवली असावी आणि त्यातूनच या आरक्षित जागेचा टक्का घसरला असावा असे समजल्या जात आहे. या उलट अनुसुचित जमाती प्रवर्गातील सदस्य संख्या २०१० च्या तुलनेत २०१५ मध्ये वाढली असल्याचे दिसून आले आहे. २०१० मध्ये अनुसुचित जमाती प्रवर्गातील प्रभाग सदस्यांची संख्या ८३ होती. तर आता २०१५ साठी जे आरक्षण निघाले त्यात ही संख्या ८७ वर पोहचली आहे. याबाबत तहसीलदार श्रीराम मुंदडा यांनी लोकसंख्येच्या उपलब्ध आकडेवारीनुसार आरक्षण पडत असल्याचे म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)