म्हणे, नग्न पूजा केल्याने आजार बरे होतात!
By Admin | Updated: March 19, 2016 00:38 IST2016-03-19T00:38:27+5:302016-03-19T00:38:27+5:30
नग्नपूजा केल्याने दुर्धर आजार बरे होतात, अशी बतावणी करीत यासाठी एका युवतीला पैशाचे आमिष दाखवून पूजेसाठी तिचा वापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ...

म्हणे, नग्न पूजा केल्याने आजार बरे होतात!
बंगाली बाबासह दोन महिलांना अटक : रामनगर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर : नग्नपूजा केल्याने दुर्धर आजार बरे होतात, अशी बतावणी करीत यासाठी एका युवतीला पैशाचे आमिष दाखवून पूजेसाठी तिचा वापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन महिलांसह एका बंगाली बाबाला रामनगर पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे तक्रारकर्ती युवती, तिचे मित्र व नातलगांनी सापळा रचून भोंदूबाबाचा हा कट उधळून लावला.
स्थानिक वरोरा नाका चौक परिसरातील रहिवासी दीपाली बिसन (३९) हिच्या मुलीला महिलांसंबंधी दुर्धर आजाराने ग्रासले होते. अनेक डॉक्टरांकडे जाऊनसुद्धा तिला आराम होत नव्हता. त्यामुळे तिला कुणीतरी करणी केली आहे, असा भ्रम दीपालीला झाला. दरम्यान, तुकूम भागातील रहिवासी रजनी चौधरी या ओळखीतल्या महिलेने दीपालीला एक विचित्र सल्ला दिला. एका बंगाली बाबाचे नाव सांगून त्याच्या हातून कुमारीका मुलीची नग्न पूजा केल्यास आजार बरा होतो, अशी माहिती दिली. यावर दीपालीने विश्वास ठेवला आणि त्या बाबाकडून पूजा करण्याचे ठरविले. त्यासाठी तिने तिच्याच मुलीच्या मैत्रिणीला या पूजेसाठी आॅफर दिली. बदल्यात एक लाख रुपये देण्याचे कबूल केले.
मात्र हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याचे त्या युवतीच्या लक्षात आल्यानंतर तिने दीपालीशी त्या काळात सातत्याने झालेले संवाद आपल्या मोबाईलमध्ये टेप करून ठेवले. ही बाब तिने आपले काही मित्र व नातलगांना सांगितली. त्यानंतर हा प्रकार उधळून लावण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली.
१६ मार्चला पूजा करण्याचे ठरले. त्यानुसार, दीपालीच्या वरोरा नाका परिसरातील घराभोवती सापळा रचण्यात आला. यात युवतीचे नातलग व मित्र सहभागी झाले होते. ठरल्याप्रमाणे १६ मार्चला सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास युवती स्कुटीने दीपालीच्या घरी पोहोचली. तेथे अमित रामचंद्र मवाली (३२) हा भोंदूबाबा, देपाली बिसन व रजनी चौधरी हे उपस्थित होते.
पूजेची तयारी सुरू असतानाच युवतीच्या नातलग व मित्रांनी घरात शिरून या सर्वांना पकडले. त्यानंतर रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी भोंदूबाबासह तिघांनाही अटक केली असून त्यांच्याविरुद्ध कलम ३ (३), जादूटोणाविरोधी कायदा सन २०१३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. (प्रतिनिधी)