साता समुद्रापलिकडून मदतीचा हात
By Admin | Updated: February 5, 2016 00:50 IST2016-02-05T00:50:21+5:302016-02-05T00:50:21+5:30
व्हाटस्अॅप, फेसबुकमुळे २३ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा धागा पुन्हा जुळला. कॉलेज जीवनातील मैत्रीचे रूपांतर संभाषणात झाले.

साता समुद्रापलिकडून मदतीचा हात
गावकरी भारावले : जुने ऋनाणुबंध फेसबुकमुळे पुन्हा जुळले
चंद्रपूर : व्हाटस्अॅप, फेसबुकमुळे २३ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा धागा पुन्हा जुळला. कॉलेज जीवनातील मैत्रीचे रूपांतर संभाषणात झाले. शिक्षणाची आवड असल्यामुळे राजशेखर चिंतापल्ली यांनी थेट सातासमुद्रापलिकडून कोरपना तालुक्यातील हेटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाच हजार रुपयांची मदत पाठविली. परिणामी गावकऱ्यांनीसुद्धा शाळेला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सातासमुद्रापलिकडून आलेल्या मदतीचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले. हेटी येथील शाळा व्यवस्थापन समितीनेसुद्धा त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित केला.
राजशेखर चिंतापल्ली आणि मुख्याध्यापक अरूण उमरे हे दोघेही नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सन १९९२-९३ मध्ये मायनिंग या शाखेला शिक्षण घेत होते. त्यानंतर राजशेखर चिंतापल्ली यांनी व्हीआरसीई नागपूर येथून इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी भारतात नोकरी केली. मागील १३ वर्षापासून अमेरिका देशातील चेरी हिल, न्यु जर्सी येथे ते स्थायिक झाले. ते एनर्जी सर्व्हीस कंपनी, फिलाडेफिया येथे मोठ्या पदाच्या नोकरीवर कार्यरत आहे.
राजशेखर चिंतापल्ली यांना शिक्षणाची आवड आहे. काही महिण्यापूर्वी अरुण उमरे आणि राजशेखर चिंतापल्ली हे फेसबुक, व्हाटस्अॅपमुळे जवळ आले. काही दिवसांपूर्वी मला शाळेला मदत करायची आहे, असे त्यांचे बोलणे झाले. उमरे यांनी होकार देताच राजशेखर चिंतापल्ली यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यावर पाच हजार रुपयांची मदत जमा केली. याचा उलगडा मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावकऱ्यांसमोर केला. त्यामुळे गावकऱ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. आपल्या हेटी गावाशी काही एकनाते नसताना परदेशातून मदत आली. म्हणून आपणही शाळेला दान द्यावे, या हेतुने ज्याच्या त्याच्या परीने गावकरी शाळेला मदत करू लागले आहेत. त्यानंतर राजशेखर चिंतापल्ली यांच्याशी अरुण उमरे यांनी संवाद साधला. गावकरीसुद्धा शाळेला मदत करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना खुप आनंद झाला. अमेरिकेतील लोकांना हसता येत नाही. आपल्या भारत देशातील लोक प्रत्येक विनोदावर हसतात. वेळप्रसंगी गंभीरही होतात. त्यामुळे हसण्याचा आनंद घेण्याकरिता भारतातील मित्र, नातेवाईकांशी नेहमी संवाद साधत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
सातासमुद्रापलिकडून राजशेखर चिंतापल्ली यांची हेटी शाळेला आलेली मदत खरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या आलेल्या मदतीतून शाळेतील संरक्षण भिंत बोलकी करण्याचा मानस आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी चालता, बोलता, खेळताना शिकेल, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल, असे मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)