सरपंच-उपसरपंचविना गडीसुर्ला पोरका

By Admin | Updated: October 7, 2014 23:32 IST2014-10-07T23:32:02+5:302014-10-07T23:32:02+5:30

मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे सरपंच, उपसरपंच मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामविकास खुंटला आहे. गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे गडीसुर्ला हे गाव सरपंच, उपसरपंचाविना

Sarspanch-Upaschandavina Gadi Surla Porca | सरपंच-उपसरपंचविना गडीसुर्ला पोरका

सरपंच-उपसरपंचविना गडीसुर्ला पोरका

भेजगाव : मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे सरपंच, उपसरपंच मुख्यालयी राहत नसल्याने ग्रामविकास खुंटला आहे. गावात अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्यामुळे गडीसुर्ला हे गाव सरपंच, उपसरपंचाविना पोरका झाल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये आहे.
या ग्रामपंचायतीमध्ये ‘महिला राज’ आहे. सरपंचपदी चेतना घनश्याम येनुरकर तर उपसरपंचपदी प्रज्ञा ताराचंद वाळके या विराजमान आहेत. सरपंच चेतना येनुरकर या जवळपास पाच वर्षांपासून मुलांच्या शिक्षणाच्या निमित्ताने तालुक्याच्या ठिकाणी मूल येथे राहतात, तर उपसरपंच प्रज्ञा ताराचंद वाळके यांचे मागील मे महिन्यात लग्न होवून त्या सासरी गेल्या. त्यामुळे सध्यस्थितीत गावात सरपंच, उपसरपंच राहत नसल्याने ग्रामविकासात अडसर निर्माण होत आहे.
गावात आरोग्याच्या सोयी नाहीत. स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी नाही. शासकीय योजना लोकांपर्यंत पोहचत नाही. गावात एखाद्यावेळी शासकीय- निमशासकीय अधिकारी भेटीसाठी आल्यास त्यांची भेट गावाचा प्रथम नागरिक या नात्याने सरपंचाशी होत नाही. सरपंच हा गावचा प्रथम नागरिक मानला जातो. मात्र गावाचा प्रथम नागरिकच गावकुसाबाहेर राहून राजकारण करीत असेल तर त्याचा गावाला काय उपयोग, असा प्रश्न गावकरी विचारत आहेत. ग्रामस्थांना एखाद्या शासकीय योजनेचा लाभ घेताना सरपंचाचा रहिवासी दाखला, त्यावर सरपंचाच्या स्वाक्षरीची आवश्यकता असते. मात्र सरपंचच या गावात हजर राहत नसल्याने लाभार्थ्यांना त्यांच्या भेटीसाठी तालुक्याच्या ठिकाणी मूल येथे जावे लागते. वेळप्रसंगी सरपंचाची भेट न झाल्यास परत यावे लागते. अनेकदा सरपंचाची स्वाक्षरी न झाल्याने लाभार्थ्याला योजनेपासून वंचित राहावे लागते.
गडीसुर्ला या गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत बोरचांदलीसह १९ गावांसाठी पाणी पुरवठ्याचे केंद्र आहे. मात्र याच गावात शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांना शुद्ध पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याला ग्रामपंचायतीचा नाकर्तेपणा असल्याचे ग्रामस्थांमध्ये बोलल्या जात आहे. सरपंच, उपसरपंच दोन्ही पदाधिकारी गावात राहत नसल्याने गावातील शासकीय निमशासकीय कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. परिणामत: गाव विकासापासून कोसो दूर आहे. (वार्ताहर)

Web Title: Sarspanch-Upaschandavina Gadi Surla Porca

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.