सरपंचपदाच्या महिला उमेदवारास मारहाण
By Admin | Updated: September 13, 2015 00:55 IST2015-09-13T00:55:43+5:302015-09-13T00:55:43+5:30
दोनही गटाकडे निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या सारखी असल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला.

सरपंचपदाच्या महिला उमेदवारास मारहाण
ब्रह्मपुरी : दोनही गटाकडे निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या सारखी असल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला. मात्र पर्याय म्हणून एका गटाने अपक्ष महिला उमेदवाराला सरपंचपद देण्याचा निर्णय घेतला. त्यातून निर्माण झालेल्या वादात दुसऱ्या गटाने सरपंचपदासाठी दावेदार असेलेल्या अपक्ष महिलेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चांदली येथे शनिवारी दुपारी घडली.
याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान, या प्रकारामुळे आता सरपंचपदाची निवडणूक रविवारी घेण्यात येणार आहे.
शनिवारी चांदल येथे सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येणार होती. सात सदस्यीय ग्रामपंचायतीत एका गटाचे तीन तर दुसऱ्या गटाचे तीन उमेदवार निवडून आलेत. एक अपक्ष महिला उमेदवार निवडून आली. सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने सर्व भिस्त रेखा करंबे या महिला उमेदवारावर होती. त्यामुळे एका गटाने त्याना सरपंचपद देण्याचा निर्णय घेतल्याने दुसरा गट संतप्त झाला. रेखा करंबे व त्यांचे सासरे बालाजी करंबे हे शनिवारी दुपारी नामांकन भरण्यासाठी जात असताना दुसऱ्या गटातील सदस्यांनी रस्त्यात अडवून अडवून त्यांना मारहाण केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी निवडणुकीची प्रक्रीया रविवारी घेण्याचे ठरले. (तालुका प्रतिनिधी)