खोट्या आरोपात गेले आदिवासी महिलेचे सरपंचपद
By Admin | Updated: March 14, 2015 01:05 IST2015-03-14T01:05:21+5:302015-03-14T01:05:21+5:30
चिमूर तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खडसंगी गटग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन अशोक कुंभरे या मागील अडीच वर्षापासून...

खोट्या आरोपात गेले आदिवासी महिलेचे सरपंचपद
खडसंगी: चिमूर तालुक्यातील संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या खडसंगी गटग्रामपंचायतीच्या सरपंच सुमन अशोक कुंभरे या मागील अडीच वर्षापासून गावाचा कारभार सांभाळत आहे. मात्र रुपचंद शास्त्रकार यांनी शौचालय नसल्याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकाऱ्याकडे केली. या तक्रारीवरुन ग्रामविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करुन शौचालय असल्याचा प्राथमिक अहवाल वरिष्ठांना दिला. मात्र या अहवालात हेराफेरी करुन शौचालय नसल्याचा दुसरा अहवाल वरिष्ठाच्या व राजकीय पुढाऱ्यांचा दबावात दिल्याचा आरोप सरपंच सुमन कुंभरे यांनी पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे शासनाच्या या लालफित शाहीमध्ये आदिवासी महिला सरपंचास आपले पद गमवावे लागले.
आपण सरपंच बनण्यापूर्वी सन १९९७-९८ मध्ये घरकूल मंजूर झाले. त्यावेळी शौचालयाचे बांधकाम केले. निवडणुकीदरम्यान नियमानुसार नामांकन अर्ज दाखल करून शौचालय असल्याचे प्रमाणपत्र सादर केले. सार्वत्रिक निवडणुकीत विजयी होवून सरपंचपदावर विराजमान झाले.मात्र अडीच वर्षानंतर शास्त्रकार यांनी आपल्याकडे शौचालय नसल्याची तक्रार केली. शौचालय असतानाही अधिकाऱ्यांनी शौचालय नसल्याचा चुकीचा अहवाल वरिष्ठांना पाठविला. कुठलीही चौकशी न करता किंवा आपली बाजू माडण्यांस वेळ न देता अधिकाऱ्यांनी आपल्याला अपात्र घोषित केल्याचा आरोप करण्यात आला. सरपंच सुमन कुमरे यांच्यावरच शौच्छालय असतानाही कोणत्या कारणाने कारवाई करण्यात आली, हा प्रश्न अद्यापही कायम आहे.
आपल्याकडे शौचालय आहे आणि ते वापरात असतानाही खोटा अहवाला वरिष्ठांना देणाऱ्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुमन कुमरे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला उपसरपंच दत्तु देव्हारे, ग्रामपंचायत सदस्य सदस्य अरविंद पाटील, माजी सरपंच नम्रता वासनिक, सुभाष सोनुने आदी उपस्थित होते.(वार्ताहर)