ईश्वरचिठ्ठीने निवडून आलेली महिला होणार सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:35 IST2021-02-05T07:35:33+5:302021-02-05T07:35:33+5:30
निलेश झाडे गोंडपिपरी : योग असला की राज्य हमखास मिळते. यासाठी नशीब हवे, असे राजकारणात बोलले जाते. ...

ईश्वरचिठ्ठीने निवडून आलेली महिला होणार सरपंच
निलेश झाडे
गोंडपिपरी : योग असला की राज्य हमखास मिळते. यासाठी नशीब हवे, असे राजकारणात बोलले जाते. विहीरगाव ग्रामपंचायतेचा घटनाक्रम बघितला की तुम्हीही म्हणाल, नशीबवानच ती. समान मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठीत तिने बाजी मारली. सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. अनुसूचित जमाती महिलांकरिता सोडत निघाली. अनुसूचित जमातीमधून निवडून आलेली ती एकमेव महिला उमेदवार असल्याने सरपंचपदाची माळही आपसूकच तिच्या गळ्यात पडली.
या नशीबवान महिलेचे नाव आहे आशा मडावी. विहीरगावात घडलेल्या या ईश्वरी योगाची चर्चा तालुक्यात आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथील प्रभाग ३ मध्ये अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या प्रभागातून आशा मडावी व कल्पना मडावी या आमनेसामने होत्या. निवडणुकीचा निकाल लागला आणि दोन्ही उमेदवारांना समान ५८ मते मिळाली, तर एक मत ‘नोटा’वर गेले. निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. मेश्राम यांनी ईश्वरचिठ्ठीने निकाल दिला. यात आशा मडावी या विजयी झाल्या. शुक्रवारी (दि. २९) सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यावेळी विहीरगावचे सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिलासाठी आरक्षण आले. गावात सात सदस्यांपैकी आशा मडावी या अनुसूचित जमाती गटात मोडणाऱ्या एकमेव महिला आहेत. त्या ज्या पॅनलकडून लढल्या, त्याचे केवळ दोनच उमेदवार निवडून आले होते; पण आता त्यांच्या गटाची उमेदवार गावची सरपंच होत असल्याने त्यांनीही उत्सव साजरा केला.