सरपंच बनताच झाली अटक

By Admin | Updated: September 10, 2015 00:47 IST2015-09-10T00:47:12+5:302015-09-10T00:47:12+5:30

एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते.

Sarpanch was arrested soon after | सरपंच बनताच झाली अटक

सरपंच बनताच झाली अटक

मनरेगाव घोटाळा प्रकरण : नवनिर्वाचित सरपंचाला एकाच दिवशी पद व अटक
ब्रह्मपुरी : एखाद्या नशिबात एका क्षणी भाग्य उजळणे आणि दुसऱ्याच क्षणी दुर्भाग्य येणे क्वचित पाहायला मिळत असते. त्याचा प्रत्यय मालडोंगरी येथील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीनंतर आला. राजेश दामोधर पारधी यांना सरपंच होताच मनरेगा घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली.
मालडोंगरी येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये ग्रामरोजगार म्हणून राजेश दामोधर पारधी कार्यरत होते. या योजनेमध्ये १ लाख ४ हजार ६३९ रुपयांची अफरातफर झाली असल्याचे चौकशी अंती उघडकीस आल्याने संवर्ग विकास अधिकारी प्रकाश तोडेवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार राजेश दामोधर पारधी यांना अटक करण्यात आली. अटकेचा दिवस व सरपंच पदाची निवड बुधवारीच झाली, हे विशेष.
यापूर्वी पिंपळगाव (भो.) येथे ग्रामरोजगाराला अटक झाली होती. त्यानंतर मालडोंगरी येथे तसाच मनरेगा घोटाळा उघडकीस आला. मनरेगा योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण संपूर्ण तालुक्यातच लागल्याचे हळूहळू उघडकीस येऊ लागले आहे. असेच या प्रकरणावरुन दिसून येत आहे. राजेश दामोधर पारधी यांनी प्रत्यक्ष कामावर असलेल्या मजुरांचे नाव नसणे, मस्टर अदलाबदल करणे, कामावर आपल्या हितसंबंधी लोकांना घेणे आदी व इतर कारणांची तक्रार पंचायत समितीमध्ये करण्यात आली. त्यानुसार संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्या चौकशीत सत्यता आढळून आल्याने फिर्यादी प्रकाश तोडेवार यांनी ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये एक लाख चार हजार ६३९ रुपयांची अफरातफर केल्याची तक्रार केली. त्यानुसार ब्रह्मपुरी पोलिसांनी राजेश दामोधर पारधी रा. मालडोंगरी याला अटक करुन भादंवि कलम ४२०, ४०८, ४६५, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला. परंतु आज मालडोंगरी येथील सरपंच पदाची निवडणूक होती. मागील महिन्यात झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेश पारधी यांची पार्टी बहुमताने निवडून आली होती. त्यानुसार राजेश पारखीला सरपंचपदासाठी उभे करण्यात आले. एकीकडे गुन्ह्यात अटक तर दुसरीकडे सरपंचपदासाठी प्रक्रिया पूर्ण करणे असे दोन्ही प्रकार यावेळी गावकऱ्यांनी अनुभवले. प्रारंभी अटक करुन पुन्हा सरपंचपदाची उमेदवारी भरण्यासाठी नेणे, पुन्हा पोलीस ठाण्यात आणून पुन्हा मत टाकायला नेणे व सरपंच म्हणून निवड येणे असा प्रकार आज घडला. एकूणच हा प्रकार राजकारणाचा भाग असल्याचेही बोलले जात आहे. राजेश पारधी हा काँग्रेस पार्टीकडून निवडून आला आहे. तर मनरेगामध्ये केलेला घोटाळा भाजपाने उघडकीस आणून दिलेला असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग प्राप्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पुढे हे प्रकरण कोणते वळण घेणार, याकडे सर्व तालुकावासियांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Sarpanch was arrested soon after

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.