सरपंच आरक्षणाने अनेक जण सत्तेच्या बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:33 IST2021-02-05T07:33:38+5:302021-02-05T07:33:38+5:30
घनश्याम नवघडे नागभीड : नागभीड तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या आरक्षणाने अनेक प्रस्थापित ...

सरपंच आरक्षणाने अनेक जण सत्तेच्या बाहेर
घनश्याम नवघडे
नागभीड : नागभीड तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या आरक्षणाने अनेक प्रस्थापित व इच्छुकांचे सरपंच होण्याचे स्वप्न भंगले आहे.
नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या; मात्र आरक्षण सोडत ही ५६ या संपूर्ण ग्रामपंचायतींची काढण्यात आली. नागभीड पंचायत समितीच्या माजी सभापती पुनम बगमारे यांचे पती पुरुषोत्तम बगमारे यांनी याअगोदर ग्रामपंचायतीचे १० वर्ष सरपंचपद भुषवले. याही वेळेस याच इराद्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले व पँनलसह निवडून आले; मात्र तेथील सरपंचपद महिला आरक्षणात गेल्याने त्यांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले आहे. नागभीड पंचायत समितीचे माजी उपसभापती कृष्णाजी उरकुडे यांचे चिरंजीव व पांजरेपारचे माजी उपसरपंच संजय उरकुडे यांनी यापूर्वी तीनदा पांजरेपारचे उपसरपंचपद भुषवले आहे. एकदा तरी सरपंच व्हावे, ही त्यांची इच्छा होती, पण दर वेळेस पांजरेपार येथे महिला किंवा अन्य आरक्षण येत गेल्याने त्यांना उपसरपंचपदावर समाधान मानावे लागले. याहीवेळेस महिला आरक्षण आले असल्याने त्यांना उपसरपंचपदावरच समाधान मानावे लागेल, असे चित्र आहे.
नागभीड तालुक्यातील सर्वात मोठ्या तळोधी ग्रामपंचायतीचे सरपंचपद मागील वेळेस अनु. जातीकरिता आरक्षित होते. यावेळी ते सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित होईल, असे अनेकांनी अपेक्षित धरून निवडणूक लढविली होती. आरक्षणाच्या सोडतीत तळोधीचे सरपंचपद सर्वसाधारण महिलेकरिता आरक्षित झाल्याने येथेही अनेकांच्या इच्छेवर पाणी फेरल्या गेले आहे. नागभीड पंचायत समितीच्या माजी उपसभापती पेंदाम यांचे पती व पारडीचे माजी उपसरपंच सुधाकर पेंदाम यांनीही सरपंच होण्याच्या उद्देशाने पारडी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली; मात्र ते सदस्यपदाच्या निवडणुकीतच पराभूत झाले.
मोहाळीचीही अशीच गोष्ट आहे. तालुक्यात राजकीयदृष्ट्या जी काही संवेदनशील गावे आहेत, त्यात मोहाळीचे नाव अग्रक्रमावर आहे. या गावच्या सरपंचपदावर अनेकांचा डोळा होता; मात्र येथील सरपंचपद अनु.जमातीसाठी आरक्षित झाले आहे. असेच संवेदनशील असलेल्या कानपा येथील सरपंचपद हे अनु.जमातीच्या महिलेकरिता आरक्षित झाले आहे. ही केवळ वाणगीदाखल उदाहरणे झाली. बहुतेक गावात अशीच परिस्थिती आहे.