नांदा येथील सरपंच अपात्र
By Admin | Updated: December 18, 2015 01:33 IST2015-12-18T01:33:20+5:302015-12-18T01:33:20+5:30
नजीकच्या नांदा येथील सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी यांनी अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार केल्याचे दोन वर्षापूर्वी उघड झाले होते.

नांदा येथील सरपंच अपात्र
भ्रष्टाचार भोवला : उपायुक्तांचा निर्णय
गडचांदूर : नजीकच्या नांदा येथील सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी यांनी अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार केल्याचे दोन वर्षापूर्वी उघड झाले होते. मात्र चौकशीत वारंवार विलंब झाल्याने कारवाईला उशीर झाला. अखेर सरपंच पूजा मडावी यांना अपात्र करण्यात आले असून उपसरपंच बंडू वरारकर यांनी प्रभारी सरपंच पदाचा भार स्वीकारला.
सरपंच पूजा मडावी यांच्या विरोधात २७ एप्रिल २०१२ रोजी नांदा येथील अंगणवाडी बांधकामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. संविअ कोरपना यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता, अंगणवाडी बांधकामात अनियमितीतता झाल्याचे निष्पन्न झाले होते. ७ लाख ३७ हजार ६६५ रुपयांचा अपहार सरपंच पूजा मडावी व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार यांनी केल्याने कारवाई करण्याबाबत अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला होता. १८ सप्टेंबर २०१४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरपंच पूजा मडावी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याबाबत जनसुनावणी घेऊन अहवाल आयुक्तांकडे पाठविला. उपायुक्त पुनर्वसन नागपूर यांनी १० डिसेंबरला आदेश पारीत करुन सरपंच पूजा मडावी यांचे कलम ३९(१) अंतर्गत सदस्यत्व रद्द केले. (शहर प्रतिनिधी)