निवडून आलेल्या सदस्यातुन सरपंच निवडायचा असल्याने चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:25+5:302020-12-31T04:28:25+5:30
राजू गेडाम मूल : मागील पाच वर्षापूर्वी थेट सरपंचाला जनतेतून निवडून द्यायचे होते तसेच सरपंचपदाचे आरक्षण ...

निवडून आलेल्या सदस्यातुन सरपंच निवडायचा असल्याने चुरस
राजू गेडाम
मूल : मागील पाच वर्षापूर्वी थेट सरपंचाला जनतेतून निवडून द्यायचे होते तसेच सरपंचपदाचे आरक्षण पूर्वीच माहीत असल्याने पाहिजे त्या प्रमाणात चढाओढ नसल्याचे दिसून आले. मात्र यावर्षी सरपंचपदाचे कुठले आरक्षण पडेल हे माहीत नसल्याने सर्व पक्षाचे उमेदवार डोक्याला बाशिंग बांधून निवडणुकीत आपले नशीब आजमावायचा प्रयत्न चालविला आहे. शासनाने थेट ग्रामपंचायतीला निधी मिळत असल्याने या निवडणुकीत चुरस वाढण्याचे संकेत मिळू लागले आहे. महाराष्ट्र शासनाने १५ जानेवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी जनतेतून निवडून द्यायच्या सरपंच पदासाठीचा निर्णय रद्द करून निवडुन आलेल्या सदस्यातून सरपंच निवडण्याचा निर्णय घेतला. तसेच सरपंचपदाचे आरक्षण देखील निवडणुकीनंतर ठरणार असल्याने या निवडणुकीत चढाओढ दिसत आहे. या निवडणुकीत प्रमुख्याने भाजपा काँग्रेस या पक्षात चुरस असली तरी राकाँ ,बसपा, शिवसेना व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावायचा प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहेत. सध्या ३७ ग्रामपंचायतीपैकी जवळपास १७ ग्रामपंचायतीमध्ये भाजपा तर १७ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे तर तीन ग्रामपंचायतीवर बसपा व मित्रपक्ष आहेत. यात राजोली,डोंगरगाव ,मोरवाही, टेकाडी,विरई, नलेश्वर ,जानाळा,केळझर,बोंडाळा,बुज.,येरगाव,चिखली,भादुर्णी,चिमढा,फिस्कूटी, चिरोली,नांदगाव ,गोवर्धन, पिपरी दीक्षित, मुरमाडी, मारोडा, काटवन, चितेगाव, बोरचादली, चांदापूर, जुनासुर्ला, चिचाळा, हळदी, सुशी दाबगाव,दाबगाव मक्ता,नवेगाव, भूजला, गांगलवाडी, कोसंबी, मरेगाव, राजगड, भवराळा, खालवसपेठ,उथडपेठ आदी गावांचा समावेश आहे. या निवडणुकीत ५४,९०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २६८९८ महिला तर २८००८ पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जवळपास ५५ हजार मतदाराच्या हातात ३७ सरपंच व २८० सदस्याचे भवितव्य अवलंबून आहे.