संततधार : जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: June 22, 2015 01:15 IST2015-06-22T01:15:03+5:302015-06-22T01:15:03+5:30
पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर शेतकरी एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा पूर्ण झाली आहे.

संततधार : जनजीवन विस्कळीत
अनेकांच्या घरात पाणी : चंद्रपूर तालुक्यात पावसाची सर्वाधिक २०० मिमी नोंद
चंद्रपूर : पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर शेतकरी एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. ही प्रतीक्षा पूर्ण झाली आहे. मात्र अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने अधिक पाऊस पडल्याने अनेकांचे नुकसान झाले. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. या संततधार पावसामुळे चंद्रपुरातील अनेक रस्त्यावर पाणी साचून त्या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. पठाणपुरा गेटजवळील झरपट नाल्याला आलेल्या पुरात १९ वर्षीय युवक वाहून गेला. सखल भागात अनेकांच्या घरात पाणी शिरले. चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक २०० मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे जनजीवनच विस्कळीत झाले.
पावसाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या दिवसातील हा सर्वाधिक पाऊस आहे. पावसाने जराही उसंत न घेतल्याने गावागावातील व्यवहार ठप्प पडले. चंद्रपूरसह कोरपना, जिवती तालुक्यातील अनेक गावातील घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले.
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच तालुक्यात काल्ां शनिवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. प्रारंभी रिमझिम पाऊस बरसला. मात्र त्यानंतर पावसाचा वेग वाढू लागला. रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच होती. रविवारी सकाळीदेखील पावसाचे कोसळणे सुरूच होते. रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास १५ ते २० मिनिटे पावसाने उसंत घेतली असावी. त्यानंतर पुन्हा पावसाची रिपरिप सुरू झाली. रविवारी रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरूच होता. या संततधार पावसामुळे चंद्रपुरातील हिंदी सिटी हायस्कूलजवळ तीन ते चार फूट पाणी होते. पोलीस प्रशासनाने हा मार्गच रहदारीसाठी बंद केला होता. याशिवाय कस्तुरबा मार्ग, महात्मा गांधी मार्ग, जयंत टॉकीज, सीटी हायस्कूल, श्री टॉकीज, गंजवॉर्ड, गोलबाजार, बिनबा रोड, तुकूम परिसरातील वाहतूक कार्यालय, ऊर्जानगर मार्ग हे रस्ते जलमय झाले होते. भद्रावती तालुक्यातील कचराळा गावाजवळ बांधण्यात येत असलेला पुल वाहून गेल्याने तालुक्यातील कचराळा या गावाचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर तालुक्यात सर्वाधिक २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. घुग्घुस येथील कॉलरी तलावाचा ओव्हरफ्लोचा मार्ग खुला न केल्याने तलाव परिसरातील २०-२५ घरात पाणी शिरले.सोबतच वेकोलिचे कोळसा उत्पादनही प्रभावित झाले. (शहर प्रतिनिधी)
ब्रह्मपुरी-वडसा राज्य मार्गावरील वाहतूक खोळंबली
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरीवरुन वडसा येथे जाणाऱ्या राज्यमार्गावर सुरबोडी गावालगत एका नवीन काम केलेल्या वळणावर चिखलाचे खड्डे निर्माण झाल्याने एक ट्रक फसला आणि त्यामुळे काल रात्रोपासून वडसा मार्ग पूर्णत: बंद झाला आहे. वाहतूक अन्य मार्गाने सुरू ठेवण्यात आली आहे. ब्रह्मपुरी-वडसा हा दहा किमीचा राज्यमार्ग आहे. या मार्गावर सुरबोडी गावाजवळ मुख्य रस्त्याच्या बाजूने एक वळण तयार करण्यात आले आहे. परंतु वळण रस्ता हा मजबूत केला नाही. पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले व खड्डा मोठा होऊन एक मालवाहू ट्रक फसला. हा ट्रक फसल्याने वाहनांची मोठी रांग लागून वाहतूक खोळंबली आहे.
मनपाची नाले सफाई गेली कुठे ?
पावसाळा सुरू होण्यापूर्वी उपाययोजना म्हणून महानगरपालिकेने मोठा गाजावाजा करून चंद्रपुरातील मोठे नाले सफाई मोहीम सुरू केली. जेसीबीने गाळ काढताना छायाचित्र टिपून ते प्रसारमाध्यमांकडे पाठवित स्वत:चीच पाठ थोपटून घेतली. मात्र ही नाले सफाई केवळ फार्स असल्याचे मंगळवारी व शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे स्पष्ट झाले. या नाल्यांमुळे बॅक वाटर अनेक रस्त्यावर साचून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
सुटी आणि पावसाचा आनंद
शनिवारी रात्री सुरू झालेला पाऊस रविवारी दिवसभर सुरू होता. रविवार हा सुटीचा दिवस असल्याने अनेकांनी या पावसाचा आनंद लुटला. तरुणांनी तर छत्री, रेनकोट न घेताच पावसात मनमुराद फिरणे पसंत केल्याचे दिसून आले. अनेकजण पावसात मनसोक्त भिजत होते.
घरावर वीज कोसळली
ब्रह्मपुरी : देलनवाडी वॉर्डातील शांतीनगरात डॉ.गणवीर यांच्या दवाखान्याजवळ राहत असलेले भाविक सुखदेवे यांच्या घरावर वीज पडली. सुदैवाने जिवित हानी झाली नाही. परंतु घरावर लावलेले नावाचे अक्षर, टॉवरची भिंत व मीटरचे कव्हर, घरातील लाईटचे बोर्ड, कॉलबेल या वस्तू तुटून पडल्या. त्यांचे जवळपास ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
अनेक शेतकरी एका दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. शनिवारी आणि रविवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. गावातील तलाव, बोडी, छोटे तलाव यात पाणी साचल्यामुळे आता पेरणीच्या कामांनाही वेग येणार आहे.