संदीप सीमेवर निघाला अन् निरोपाचा क्षणही गहिवरला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:54 IST2016-11-02T00:54:32+5:302016-11-02T00:54:32+5:30
भारत- पाक सीमेवर सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती आहे. लेह- लद्दाख येथे याहून वेगळी अवस्था नाही.

संदीप सीमेवर निघाला अन् निरोपाचा क्षणही गहिवरला...
लेह- लद्दाखमध्ये नियुक्ती : संपूर्ण गाव झाले गोळा
घनश्याम नवघडे नागभीड
भारत- पाक सीमेवर सद्यस्थितीत युद्धजन्य परिस्थिती आहे. लेह- लद्दाख येथे याहून वेगळी अवस्था नाही. पण अशाही परिस्थितीत बाम्हणी येथील नागरिकांनी गावच्या एका सुपूत्राला लेह- लद्दाख येथे जाण्यासाठी सोमवारी अतिशय भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. यावेळी संपूर्ण गाव गोळा झाले. या भावस्पर्शी प्रसंगामुळे संपूर्ण ग्रामस्थ भारावले होते.
नागभीडपासून सहा किमी अंतरावर असलेल्या बाम्हणी येथील गणूजी नन्नावरे यांची परिस्थिती अगदी बेताचीच. त्यांना एकूण सहा मुले, त्यात चार मुली आणि दोन मुले यातील संदीपची देहयष्टीे बऱ्यापैकी. त्याची सैन्यात जायची मनपासून इच्छा. त्यादृष्टीने त्याने प्रयत्नसुद्धा चालविले आणि यात त्याला यशही आले.
मागील महिन्यात संदीपचे सैन्यविषयक प्रशिक्षण गोवा येथे आटोपले. प्रशिक्षण आटोपल्यानंतर संदीपला नियुक्तीचा आदेश मिळाला. ४ नोव्हेंबर रोजी त्याला रुजू होण्याचेसुद्धा या आदेशात म्हटले असल्याने ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संदीपने घरुन निघण्याचे निश्चित केले. एव्हाना संदीपची सैन्यात निवड झाली आणि तो नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघणार आहे, ही वार्ता छोट्याशा बाम्हणीमध्ये कर्णोपकर्णी झाली आणि जो तो संदीपच्या घरी जावून संदीपला शुभेच्छा देऊ लागला.
या शुभेच्छा मागे एक वलयसुद्धा आहे. एक तर बाम्हणी या गावातील संदीप हा पहिलाच युवक आहे की ज्याची सैन्यात निवड झाली आणि तीसुद्धा युद्धजन्य परिस्थिती असलेल्या लेह- लद्दाखमध्ये.
त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक वेगळी हूरहूर होती. अगदी भावूक होऊन प्रत्येक जण संदीपला निरोप देत होता आणि गावचा एक तरुण देशाच्या रक्षणासाठी जात आहे, याचा अभिमानही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. ही चहलपहल संदीपच्या घरी अगदी सोमवारी दिवसभर सुरु होती.
शेवटी संध्याकाळी गावच्या बसथांब्यावर संदीप आला, तेव्हा गावकऱ्यांनी आणखी संदीपभोवती गराडा घातला. बस आली. संदीप बसमध्ये चढला आणि संदीपने बसमधून निरोपाचा हात हलविला. तेव्हा तमाम गावकऱ्यांच्या नेत्रकडा पाणावल्या होत्या. निरोपाचा हा क्षणही गहिवरून गेला होता, मात्र बाम्हणीचा हा वीर नवजवान भारतमातेच्या रक्षणासाठी पुढे निघाला होता.