कॅण्डल मार्च काढून दिला शांततेचा संदेश
By Admin | Updated: September 14, 2015 00:42 IST2015-09-14T00:42:41+5:302015-09-14T00:42:41+5:30
नजीकच्या नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा जोगी (५५) ....

कॅण्डल मार्च काढून दिला शांततेचा संदेश
जोगी दाम्पत्य हत्याकांड : शेकडो लोकांचा सहभाग
गडचांदूर : नजीकच्या नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा जोगी (५५) या दाम्पत्याची ३१ आॅगस्टला रात्री ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली. १३ दिवस उलटले मात्र अद्याप आरोपींचा शोध लागला नाही. त्यामुळे नांदा गावात अजूनही दहशत कायम आहे. गुरुवारी गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवासीयांच्या वतीने नांदा ते नांदाफाटा चौकापर्यंत कॅण्डल मार्च काढून शांततेचा संदेश दिला. नांदाफाटा येथील चौकात सामूहिक श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी शेकडो गुरुदेव भक्त व गावकरी उपस्थित होते.
पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरु असून आरोपींना पकडण्यात लवकरच यश येईल, असा विश्वास पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला होता. पोलीस योग्य तपास करीत असले तरी आरोपीपर्यंत पोहचण्यास बराच विलंब झाला आहे. त्यामुळे आरोपी सापडतील की, नाही अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. पोलिसांच्या हाती अजूनही काही ठोस पुरावे लागले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे गावकऱ्यांत रोष असून आरोपींना अटक करण्याची मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)
गावात दहशत कायम
नेहमी रात्री ११-१२ वाजेपर्यंत जागणारे नांदावासी आता ९ वाजताच झोपतात. गावकऱ्यांनी इतकी सुन्न करणारी घटना आयुष्यात कधी बघितली नाही. सायंकाळी ९ वाजता वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे गावावर भीतीचे सावट आहे. आरोपी पकडेपर्यंत गावकरी सुखाची झोप घेणार नसल्याचे दिसते.