एकाच आठवड्यातील ‘त्या’ दोन घटनेने समाजमन गहिवरले
By Admin | Updated: June 1, 2017 01:22 IST2017-06-01T01:22:49+5:302017-06-01T01:22:49+5:30
मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. तो कधीही, कुठेही व कोणत्याही वाटेने आला तरी तो अशुभच आणि दु:खदायीच.

एकाच आठवड्यातील ‘त्या’ दोन घटनेने समाजमन गहिवरले
लग्नात विघ्न: चौघांचा जीव गेला
वसंत खेडेकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. तो कधीही, कुठेही व कोणत्याही वाटेने आला तरी तो अशुभच आणि दु:खदायीच. पण, लग्न समारंभासारख्या आनंदाच्या व शुभक्षणी तो आला की त्याची व त्याच्याने होणाऱ्या दु:खाची-हानीची तिव्रता अधिक वाढते. त्याचा अनेकांना, अनेक प्रकारे फ टका बसतो. येथे एकाच आवठवड्यात दोन-तीन दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या घरातील लग्नप्रसंगी मृत्यूने चार जिवांना गाठून, लग्न प्रसंगीच्या आनंद व उत्साहात विरजन पाडले.
एवढेच नव्हे, तर एका घरी खुद्द उपवरावर मृत्यूने घाला घातला. सोबतच, त्याच्या आईलाही मृत्यूने कवेत घेतले. येथील पेपर मिल समोरील फुलसिंग नाईक वार्डात आयोजित एका लग्न समारंभात भाग घेण्याकरिता अगदी जवळचे नातेवाईक असलेले राहुल कोटावार आणि स्वप्नील कोटावार आले होते. हळदीचा कार्यक्रम व इतर कार्यक्रमात भाग घेता यावा म्हणून ते दोन दिवसांपूर्वीच आले होते. १७ आणि १९ वर्षे असलेले हे दोघ चुलतभावंड सकाळी वर्धा नदीच्या घाटावर आंघोळीकरिता गेले आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन दिवसांवर लग्न असलेल्या घरी यामुळे शोककळा पसरली. त्या मुलांच्या कुटुंबावर या दु:खद प्रसंगाने जे संकट कोसळले, त्याचे वर्णन शब्दातीत आहे. या घटनेच्या तीन दिवसांनंतरच याच परिसरात विवेकानंद वार्डात याच प्रकारे अत्यंत दुर्देवी घटना घडली. या वार्डातील व पेपर मिलमध्ये नोकरीला असलेल्या विनोद त्र्यंबके यांचे लग्न २ जूनला ठरले होते. त्यांच्या आई नजिकच्या टाक्यातून पाणी काढायला गेल्या. त्या टाक्याला विद्युतस्पर्श असल्याने त्याचा झटका त्यांना लागला व त्या त्या खाली कोसळल्या. आईला काय झाले हे बघायला गेलेल्या विनोदलाही विद्युत स्पर्श झाल्याने आईसोबत तोही दगावला. या आकस्मित दुर्घटनेने आनंदी क्षणाची जागा दु:ख आणि अश्रूंनी घेतली. आई आणि मुलाची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. तो सारा क्षण सर्वांचे अश्रू अनावर करणारा होता. कुठेही घडू नये, असे त्र्यंबके कुंटुंबाबाबत घडले. हे सारे बघून, नियती अशी निष्ठूर का वागते, असा प्रश्न कुणालाही पडेल.
सरता आठवडा बल्लारपूला वाईट व दुर्देवी घटनांचा गेला. लग्नप्रसंगीच्या या घटनांसोबत त्याच दरम्यान येथील पी.डी.पोले या वनपालाचा अचानक मृत्यू झाला. पोले हे आपल्या मित्रासोबत बाईकने जंगलात जात असताना, बाईक घसरली. मित्राला बरीच इजा झाली. पोले यांचे किरकोळवर निभावले. ते प्राथमिक उपचारानंतर घरी आराम करीत बसले असताना घरी साप निघाला. त्याला बघण्याकरिता उठले असताना छातीत कळ आली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अशा एकामागून एक दुर्देवी घटना या एकाच आठवड्यात बल्लारपुरात घडल्या आहेत.