परवान्याविना खाद्य पदार्थांची विक्री
By Admin | Updated: February 26, 2017 00:39 IST2017-02-26T00:39:33+5:302017-02-26T00:39:33+5:30
चंद्रपुराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तशी व्यावसायिक प्रतिष्ठानेही वाढत आहे.

परवान्याविना खाद्य पदार्थांची विक्री
हातठेल्यांवर कुणाचाच वॉच नाही
चंद्रपूर : चंद्रपुराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. तशी व्यावसायिक प्रतिष्ठानेही वाढत आहे. मागील काही वर्षात चंद्रपुरात हॉटेल्स, रेस्टारंटचीही संख्या वाढली आहे. मात्र यातील बहुतांश हॉटेल्समधून परवान्याविनाच खाद्य पदार्थांची विक्री सुरू असल्याची माहिती आहे. अनेकांनी परवाना नुतनीकरण न करताच हा व्यवसाय सुरू ठेवला आहे.
खाद्य पदार्थाचा थेट संबंध आरोग्याशी असतो. त्यामुळे खाद्य पदार्थांची विक्री करताना अनेक निकषाची पूर्तता करावी लागते. मात्र या भानगडीत हॉटेल व्यावसायिक पडताना दिसत नाही. मागील काही वर्षात चंद्रपुरातील लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. याशिवाय चंद्रपूर हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी दररोज हजारो नागरिक बाहेरगावावरून या ना त्या कामासाठी येतच असतात. त्यामुळे उत्पन्नाचे चांगले स्रोत म्हणून हॉटेल थाटून अनेक जणांनी आपले बस्तान मांडले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत हा विषय असल्याने अशा हॉटेल्समध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाते की नाही, वाहनतळ आहे की नाही, हे तपासून महानगरपालिकेकडून प्रमाणपत्र दिले जाते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून काही अटींची पूर्तता केल्यानंतर त्यांना परवाना दिला जातो.
एवढे सर्व करूनही जिल्हाधिकारी कार्यालयातून इटींग परवानाही या हॉटेल्सधारकांना घ्यावा लागतो. हे परवाने दरवर्षी नुतनीकरण करून घ्यावे लागतात.
मात्र चंद्रपूर शहरातील अनेक हॉटेल्सधारकांनी इटींग परवाना नुतनीकरणच केलेला नाही. परवाना नसतानाही अशा हॉटेल्समधून सर्रास खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. इटींग परवाना मिळविण्यासाठी काही कागदपत्रांची व अटींची पूर्तता करावी लागते. मात्र अनेक हॉटेल्समध्ये याची पूर्तता केली जात नसल्याचीही माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
खाद्य पदार्थाच्या दर्जाकडेही दुर्लक्ष
चंद्रपुरात रस्त्यारस्त्यांवर हातठेल्यांमधून खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. त्यानंतर उघड्यावरच हे पदार्थ ठेवले जातात आणि विकलेही जातात. हे खाद्य पदार्थ खाऊन नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते. असे असतानाही याकडे महानगरपालिका, अन्न व औषध प्रशासन विभाग व जिल्हा प्रशासनाचे लक्ष नाही. या दुकानांमध्ये जाऊन खाद्य पदार्थांच्या दर्जाची तपासणी करण्याचे सौजन्यही संबंधित विभागाकडून दाखविले जात नाही.