समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन अद्यापही थकीत
By Admin | Updated: March 26, 2017 00:30 IST2017-03-26T00:30:46+5:302017-03-26T00:30:46+5:30
बलशाही समाज व देश घडविण्यासाठी शिक्षणाची गरज ओळखून शासनाने अनके महाविद्यालये काढून शिक्षणास प्राधान्य दिले.

समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन अद्यापही थकीत
चार महिन्यांपासून आर्थिक संकट : कर्जाचे हप्ते फेडण्यात येत आहेत अडचणी
राजकुमार चुनारकर चिमूर
बलशाही समाज व देश घडविण्यासाठी शिक्षणाची गरज ओळखून शासनाने अनके महाविद्यालये काढून शिक्षणास प्राधान्य दिले. यासह समाजातील विद्यार्थी, नागरिकांत समाजसेवेची ओढ लागावी व चांगले विद्यार्थी उपजत तयार व्हावे, म्हणून समाजकार्यात महाविद्यालयातून समाजकार्याचे शिक्षण देण्यात येत आहे. मात्र समाजकार्याचे सैनिक घडवणांऱ्या प्राध्यापकांचेच वेतन मागील चार महिन्यातून थकले आहेत. परिणामी प्राध्यापकांना गृहकर्ज, वाहनकर्ज फेडण्यास अडचण निर्माण झाली आहे.
विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे शिक्षण मिळावे, म्हणून शासनातर्फे विविध प्रकारचे विद्यालय, महाविद्यालय चालविले जात आहेत. समाजकार्यातही विद्यार्थी निपून व्हावे, म्हणून राज्यात ५२ अनुदानीत समाजकार्य महाविद्यालय चालविले जात आहेत. तर पाच महाविद्यालय विनाअनुदानीत तत्वावर सुरु आहेत. हि सर्व महाविद्यालये समाजकल्याण विभागामार्फत येतात. मात्र या महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणारा खर्च अपेक्षित असूनही त्याची तरतुद समाजकल्यान विभागाने केली नाही. त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयाचे मागील डिसेंबर महिन्यापासूनचे पगार झाले नाही.
समाजकल्याण विभागाने समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या पगारावर होणारा खर्चाची अर्थसंकल्पात तरतुद नसल्याने पैशाअभावी अनेकदा दोन-तीन महिने पगार होत नाही. त्यामुळे समाजकार्य महाविद्यालयात काम करणारे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी पगाराच्या भरोषावर घेतले, गृहकर्ज, वाहनकर्ज, पाल्याची शैक्षणिक फि, घर किराया, थकीत पडला आहे. त्यामुळे बँकेकडून अतिरिक्त व्याज आकारले जात आहेत. तर एलआयसीचा हप्ता थकल्यामुळे पॉलीसी बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे समाजकार्य महाविद्यालयातून समाजाचे सैनिक तयार करणाऱ्या प्राध्यापकांनाच समाजकल्याण विभागाच्या अनास्थेने आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
महाविद्यालये शिक्षण विभागाला हस्तांतरित करावे
राज्यातील समाजकार्य महाविद्यालये समाजकल्याण विभागाकडून चालविले जात आहेत. मध्यतरीच्या काळात मात्वे संघटनेच्या माध्यातून समाजकल्याण विभागातील सर्व महाविद्यालये शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात यावीत, या संदर्भात संघटना व समाजकल्याण मंत्री तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाली. मात्र अजून यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याची माहिती काही प्राध्यापकांनी लोकमतला दिली. ही महाविद्यालये शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्यास महाविद्यालयीन प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होवू शकणार असल्याचेही मत कार्यरत प्राध्यापकांनी व्यक्त केले.
समाजकार्य महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर पासून पगार झाले नाहीत. त्यामुळे प्राध्यापक, कर्मचाऱ्याचे गृहकर्ज, एलआयसी, प्रोव्हीटेड फंड आदीचे हप्ते थकले आहेत. अपेक्षित असणारा कर्मचाऱ्यांचा पगाराची तरतूद करणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पात या विभागातील कर्मचाऱ्याचा पगाराची तरतूद करायला हवी. मात्र तरतूद नसल्याने व समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा अनास्थेमुळे व दुर्लक्षामुळे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक कर्मचारी पगारापासून वंचित आहे.
- प्रा. अंबादास मोहिमे,
मात्वे संघटना (म.रा.)