शालार्थ वेतनप्रणाली ठरली डोकेदुखी
By Admin | Updated: May 31, 2014 23:22 IST2014-05-31T23:22:53+5:302014-05-31T23:22:53+5:30
एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वेतनासाठी शालार्थ वेतनप्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, अजूनही ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. एप्रिल महिन्याचे वेतनपत्रक या

शालार्थ वेतनप्रणाली ठरली डोकेदुखी
चंद्रपूर : एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांच्या वेतनासाठी शालार्थ वेतनप्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, अजूनही ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही. एप्रिल महिन्याचे वेतनपत्रक या प्रणालीअंतर्गत भरले असतानाही वेतनाची कार्यवाही मात्र जुन्याच पद्धतीने होत आहे. त्यामुळे नवीन वेतनप्रणालीचा नेमका फायदा काय, असा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे.
त्रुटींचे निराकरण करून नियमित मासिक वेतनाची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुषोत सलिल यांच्याकडे केली आहे. शालार्थ वेतनप्रणालीमुळे शिक्षकांचे वेतन जलद होईल. महिन्याच्या १ तारखेला वेतन होईल, असा आशावाद शिक्षकांना दाखविण्यात आला. मात्र, तो सपशेल फोल ठरला आहे. शालार्थ वेतनप्रणाली उलट मुख्याध्यापकांना त्रास व खिशाला कात्री लावणारी आहे. मुख्याध्यापकांना वेतनपत्रके ऑनलाइन भरायची आहेत. ऑनलाइनची सुविधा खेड्यापाड्यात उपलब्ध नाही. तसेच त्याचे प्रशिक्षणही त्यांना व्यवस्थित न मिळाल्यामुळे बिले तयार करण्यासाठी स्वत:चे पैसे खर्च करून इतरांची मदत घ्यावी लागत आहे. इतके करूनही पगार थेट शिक्षकांच्या खात्यावर जमा होण्याची चिन्हे दिसत नाही. पूर्वीप्रमाणेच कार्यालय प्रमुखाच्या खात्यावर पगार जमा होत आहे. त्यावर तेथील लिपिकाला उर्वरित कारवाई करावयाची आहे. त्यामुळे एप्रिलच्या वेतनाचा निधी अद्याप पंचायत समितीलाच पोहोचला नाही. मे महिनाही संपला आहे. मात्र, अजूनपर्यंंत एप्रिलच्या वेतनाचाच पत्ता नाही. पुढे नियमीत वेतन कसे होणार, हा प्रश्न शिक्षकांपुढे निर्माण झाला आहे. शालार्थ प्रणालीमधील त्रुटींचे निराकरण करून प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला नियमित वेतन अदा करण्याची मागणी पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीचे विजय भोगेकर, हरीश ससनकर, वर्हेकर, आनंदवार, नारायण कांबळे, सुरेश मस्के, उरकुडे, पी.टी. राठोड, सेलोटे, बेरड, दुष्यंत मत्ते, रवी सोयाम, अशोक दहेलकर यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)