प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2016 00:51 IST2016-11-19T00:51:08+5:302016-11-19T00:51:08+5:30
वेकोलि महिला कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.

प्रियकराच्या मदतीने सासूची हत्या
सव्वा लाखाची सुपारी : वेकोलि महिला कर्मचारी खूनप्रकरण
माजरी : वेकोलि महिला कर्मचाऱ्याच्या खून प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. त्या महिलेच्या सुनेने आपल्या प्रियकराला सासूच्या खुनाची १ लाख ३० हजार रुपयाची सुपारी दिली. तसेच पोलिसांना या हत्येमध्ये मुलगाही सहभागी असल्याचे तपासात आढळून आले आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
वेकोलिच्या माजरी क्षेत्राच्या खुल्या कोळसा खाण कार्यालयात काम करणाऱ्या बातुनीबी अमिर अली शेख यांच्या सेवानिवृत्तीला अवघे १८ दिवस शिल्लक होते. कोल इंडियामध्ये काम करीत असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील मुलगा वा मुलीला नोकरी मिळत असते. त्याचाच लोभ करून सून माजदा खातुन अनिस अमिर अली शेख (२९) व मुलगा अनिस अमिर अली शेख यांनी कट रचला. माजदा खातुन हिने आपल्या प्रियकराला १ लाख ३० हजारांची सुपारी देऊन सासूचा खून करण्यास सांगितले.
त्यानंतर आरोपी तीन-चार दिवसांपासून सदर महिलेचा पाठलाग करीत होते. जेवनाची सुटीमध्ये १२ नोव्हेंबरला दुपारी वेकोलि कार्यालयातून ती एकटी येत असताना माईन नंबर तीनच्यावेकोलि रेल्वे व्हॅगन काटा घरामागे तिच्या डोक्यावर वजनी शस्त्राने चार-पाच वार करण्यात आले. त्यामध्ये ती जागीच ठार झाली.
मारणारे आरोपी रामा राजू प्रजापती (२८), रा. मटन मार्केट, माजरी व दुसरा मुमताज शहाबुद्दीन सिद्दिकी (३०), रा. दफाई नंबर एक, माजरी हे असून दोन्ही आरोपीला पोलिसांनी विस्लोनजवळ अटक केली आहे. परंतू माजरी पोलिसांनी या दोघांना अद्याप अटक म्हणून दाखविलेले नाही. मुलगा व सूनेला अटक करून शुक्रवारी भद्रावती कोर्टात हजर केले.
भद्रावती न्यायालयाने दोन्ही आरोपींना २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार के.आर. तिवारी करीत आहेत. (वार्ताहर)
खुन्यांना तत्काळ अटक करून शिक्षा द्या
मुलगा नोकरी व संपत्तीच्या लोभापोटी रक्ताचे नाते विसरला. सून व मुलाने आपल्या आई बातुनीबी अमीर अली शेख हिची हत्या केली. या हत्येनंतर मृतक महिलाची मुलगी अनिसाबानो अस्लम शेख ने ‘लोकमत’ला सांगितले की, ही हत्या माझी वहिनी माजदा शेख अनिस अमीर अली शेख, भाऊ अनिस अमीर अली शेख, माझ्या भावाचा सासरा, साला व माझ्या वहिनीचा प्रियकर या सर्वांनी मिळुन कट रचला व तिची हत्या केली. पोलीस फक्त चौघांनाच या गुन्ह्यात आरोपी बनवले असुन इतर लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्या आईच्या हत्येस ज्या-ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांना ताबडतोब अटक करून त्यांना कडक शिक्षा द्या अशी मागणी मृतक महिलेची मुलगी अनिसाबानो अस्लम शेख हिने केली आहे.