ग्रामीण रस्त्याच्या नूतनीकरणाचा धडक कार्यक्रम
By Admin | Updated: June 27, 2016 01:22 IST2016-06-27T01:22:48+5:302016-06-27T01:22:48+5:30
विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती

ग्रामीण रस्त्याच्या नूतनीकरणाचा धडक कार्यक्रम
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी वर्षभरात २७२ कोटी
चंद्रपूर : विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळेच गेल्या केवळ एकाच वर्षात २७२ कोटी रुपये जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी देण्यात आले आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण, मजबुतीकरणासाठी पैशाची कमतरता भासणार नाही, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
मूल तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या हस्ते पूल तथा रस्त्यांचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हा परिषद सदस्या वर्षा परचाके, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल यांच्यासह त्या त्या गावचे सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील चार वर्षात जिल्हयातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या केवळ एका वर्षात २७२ कोटी रुपये रस्त्यांसाठी देण्यात आले आहेत. ग्रामीण रस्ते पक्क्या रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व रस्ते पूर्ण होतील. यासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे ते म्हणाले. रस्ते व विकासाच्या अन्य बाबतीत मूल तालुका मागे राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत बल्लारपूर मतदारसंघ हागणदारीमुक्त करण्याचे आश्वासन मी दिले आहे. हा मतदारसंघ देशातील पहिला हागणदारी मुक्त मतदारसंघ ठरणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या विश्वासावरच हे आश्वासन मी दिले आहे. यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून हागणदारी मुक्तीसाठी गावांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ही कामे होणार
पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध रस्ते व पुलांमध्ये नागपूर-मुल-खेडी-गोंडपिपरी येथील मार्गावरील गांगलवाडी जवळील एक कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या पुलाचा समावेश आहे. बोरचांदली येथील मूल-चामोर्शी रस्त्याची तीन कोटी रुपये खर्च करुन सुधारणा करणे, मूल-मारोडा-सोमनाथ रस्त्याचे एक कोटी रुपये खर्च करुन रुंदीकरण व डांबरीकरण, पेटगांव-घाटुर्नी-मारोडा-मुल-भेजगांव रस्त्याच्या नदीवरील १० कोटी रुपये खर्चाचा मोठा पुल, सुशी ते उथळपेठ रस्त्याचे ५० लक्ष रुपये खर्चाचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कोळसा-झरी-पिंपळखुट-नंदगुर-अजयपूर-केळझर-चिरोली-ताडाली रस्त्याचे १ कोटी ९० लाख रुपये खर्चांचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांचा समावेश आहे.