पाचगावात हजारो वर्षापूर्वीच्या मंदिराचे अवशेष
By Admin | Updated: November 5, 2016 02:09 IST2016-11-05T02:09:07+5:302016-11-05T02:09:07+5:30
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या पाचगावच्या जंगलात सुमारे एक हजार वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिराचे अवशेष विखुरलेले आहे.

पाचगावात हजारो वर्षापूर्वीच्या मंदिराचे अवशेष
परमारकालीन : वीरगड,शिवलिंग, देवीची मूर्ती सापडली
आकाश चौधरी गोंडपिपरी
गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या पाचगावच्या जंगलात सुमारे एक हजार वर्षापूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिराचे अवशेष विखुरलेले आहे. या परिसरात मंदिराचा अवशेष, देवीची मूर्ती, शिवलिंग, विरगड शिल्प आहेत. इतिहासकारांच्या मते हे मंदिर परमारकालिन असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाचगाव हे वनहक्क असलेले जिल्ह्यातील पहिले गाव आहे. या गावाला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. आता पाचगावचे प्राचिन महत्व समोर येवू लागले आहे. गावापासून काही अंतरावर नाला वाहतो. नाल्याच्या परिसरात प्राचिन मंदिराचे अवशेष विखुरलेले आढळतात. प्राचिन काळी या भागात एखादी संस्कृती उदयास आली असावी, असा अनुमान आहे. येथे मंदिराचा तुटलेला अमलक, मंदिराच्या खांबाचे अवशेष, कलाकृतीतून कोरलेले दगड पडलेले आहेत.
येथून काही अंतरावर अर्थनिर्मित देवीची मूर्ती आहे. या मूर्तीचा अर्धा भाग जमिनीच्या खाली असून अर्धा भाग वर आहे. गावाच्या दुसऱ्या बाजूला एका शेतशिवारात मातीपासून तयार करण्यात आलेल्या वस्तुंचे अवशेष मिळतात. याच शेतशिवारात नागरताना तांब्याची नाणी सापडल्याचे नागरिक सांगतात. याच शेतशिवाराच्या एका पाळीवर विरगड, शिवलिंग व कोरीव काम केलेले दगड पडलेले आहेत.
या भागाचे उत्खनन झाल्यास प्राचीन काळी अस्तित्वात असेल्या संस्कृतीची माहिती जगासमोर येवू शकते. या परिसरातील आढळणाऱ्या शिल्पा तथा मंदिराच्या संवर्धनासाठी ऐतीहासिक वारसा संवर्धन समिती कार्य करीत आहे.
समितीचे अध्यक्ष अरुण झगडकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार सदर मंदिराचे अवशेष एक हजार वर्ष जुने असून परमार कालीन असल्याचे अनुमान काढले आहे.
चिवंडा व कुळेनांदगावातही अवशेष
तालुक्यातील कुळे नांदगाव, चिवंडा जंगलात मंदिराचे प्राचिन अवशेष सापडलेले आहेत. अनेक शिल्प आजही सुस्थितीत आहेत. याही मंदिराचे कालखंड १२ व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येत आहे.