आरटीओ विभागाला ७६ कोटींचा महसूल
By Admin | Updated: April 8, 2017 00:49 IST2017-04-08T00:49:21+5:302017-04-08T00:49:21+5:30
राज्य शासनाने दिलेले उद्दिष्ट ९८.२३ टक्क्यांनी पूर्ण करताना चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाने तब्बल ७६.९२ कोटींचा महसूल गोळा केला आहे.

आरटीओ विभागाला ७६ कोटींचा महसूल
उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची कामगिरी
चंद्रपूर : राज्य शासनाने दिलेले उद्दिष्ट ९८.२३ टक्क्यांनी पूर्ण करताना चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाने तब्बल ७६.९२ कोटींचा महसूल गोळा केला आहे.
२०१४-१५ या वर्षीच्या तुलनेत यावर्षी महसूलात तब्बल १७ कोटींची म्हणजेच ११.५० टक्क्यांनी वाढ झाली असून कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे योग्य समन्वय व चांगल्या कामगिरीमुळेच एवढे महसूल गोळा करण्यात यश आल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी दिली.
चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाने २०१४-१५ मध्ये ५९.४२ कोटी, २०१५-१६ मध्ये ६८.९८ कोटीचे महसूल राज्य शासनाला मिळवून दिले होते. मात्र यावर्षी या महसूलात गतवर्षीपेक्षा ७.९४ कोटींनी वाढ झाली आहे. यामध्ये वाहन परवाना, नोंदणी, थकीत करवसुली, चालान, परवाना कर आदींचा समावेश आहे. राज्य शासनाने चालू वर्षांत ७८.९३ कोटींचे महसूल गोळा करण्याचे उद्दीष्ट दिले होते. यापैकी ७६.९२ कोटींचा महसूल गोळा करण्यात चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालयाला यश आले आहे. चंद्रपूर आरटीओने २०१५-१६ या वर्षात दंडात्मक कारावई करून १ कोटी ४० लाखांचा महसूल गोळा केला होता. तर चेकपोस्ट तपासणीद्वारे २ कोटी ६८ लाखांचे महसूल मिळविले होते. यात २०१६-१७ या वर्षांत मोठी वाढ झाली आहे. या वर्षांत दंडात्मक कारवाई करून १ कोटी ९० लाख महसूल गोळा झाले. यात गतवर्षीपेक्षा ३६ टक्क्यानी वाढ झाली आहे. तर चेकपोस्ट तपासणीद्वारे ३ कोटी १८ लाखांचा महसूल गोळा केला ही १९ टक्क्यांनी वाढ आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
ओव्हरलोड प्रकरणात सव्वा कोटी वसूल
ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर आरटीओची नेहमीच नजर असते. अशा वाहनांवर कारवाई करून २०१५-१६ या वर्षांत ७५ लाखांचा महसूल मिळाला होता. यावर्षी या महसूलात मोठी वाढ झाली असून तब्बल ४५० वाहनांवर कारवाई करून १ कोटी ३० लाखांचा महसूल गोळा करण्यात आला आहे.
वाहनाच्या लिलावाद्वारे ९ लाखांचा महसूल
अनेक प्रकरणात वाहने जप्त केली जातात. मात्र काही जण दंडात्मक रक्कम भरून वाहन सोडवत नाही. जप्त असलेल्या अशा ३५ वाहनांचा आरटीओंनी लिलाव काढला. यात ९.२५ लाखांचा महसूल मिळाला आहे. तर थकीत कर वसुलीच्या माध्यमातून २०१५-१६ या वर्षात १० लाखांचा महसूल मिळाला होता. यात मोठी वाढ होऊन २०१६-१७ या वर्षांत ७० लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
व्हीआयपी व आर्कषक नंबरवर ३६ लाखांचा महसूल
अनेक वाहनधारकांना विशेष आर्कषक नंबर व व्हीआयपी नंबरचे क्रेझ असते. यासाठी अधिकचे शुल्क मोजून नंबर मिळविता येते. २०१५-१६ या वर्षांत अशाप्रकारचे ४०० नंबर देण्यात आले. यातून ३० लाखांचे महसूल मिळाले होते. तर २०१६-१७ या वर्षांत ४७० क्रमांक वाटप करून ३६ लाखांचे महसूल मिळाले आहे.
कर्तव्यावरील अधिकारी व कार्यालयीन व इतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच या वर्षीचे महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करता आले. बीएस-३ वाहनांच्या नोंदणीसाठी माझ्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत काम केले. त्यामुळे यावर्षी महसुलात बरीच वाढ झाली आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवावीत व आपल्यावर होणारी दंडात्मक कारवाई टाळावी.
- विनय अहीरे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, चंद्रपूर.