रेती माफियाकडून पत्रकाराला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:43 IST2018-01-24T23:43:21+5:302018-01-24T23:43:50+5:30

रेती माफियाकडून पत्रकाराला मारहाण
आॅनलाईन लोकमत
जिवती : हिमायतनगर गावाजवळ अवैधरित्या रेती साठवणूक केलेल्या ढिगाऱ्याचा फोटो काढण्यासाठी गेलेल्या पत्रकार संतोष पेटे यांना रेती माफियांकडून दगडाने बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
हिमायतनगर येथील सदाम शेख हे हायवाने (टिपर) रेतीची वाहतूक करीत जिवती येथे विक्री करतात. रेतीची विक्री न झाल्यास रेती साठवणूक करुन नंतर ती चढत्या दराने विकली जाते. याबाबतची भनक संतोष पेटे या पत्रकाराला लागली. त्यामुळे याची खात्री पटविण्यासाठी व साठवणूक केलेल्या रेतीचे फोटो काढण्यासाठी ते गेले असता फोटो का काढला, असे म्हणत पाच ते सहा जणांनी पेटे यांना बेदम मारहाण केली.
घटनेची तक्रार जिवती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवरून आरोपींविरुध्द पोलिसांनी कलम ३२४, १४३, १४७ व १४९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.