तपाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणीपट्टीचे ५४ लाख रुपये थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST2021-05-19T04:29:32+5:302021-05-19T04:29:32+5:30

नागभीड : नागभीडसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तपाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी करापोटी ५३ लाख ८६ हजार ५२९ रुपये ...

Rs 54 lakh in arrears of Tapal water supply scheme | तपाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणीपट्टीचे ५४ लाख रुपये थकीत

तपाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणीपट्टीचे ५४ लाख रुपये थकीत

नागभीड : नागभीडसह अकरा गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तपाळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी करापोटी ५३ लाख ८६ हजार ५२९ रुपये थकीत असल्याची माहिती आहे. विविध ग्रामपंचायती व नगर परिषद वेळेवर कराचा भरणा करीत नसल्याने ही योजना चालवायची कशी, असा प्रश्न तपाळ प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

१९९५ मध्ये युती शासन सत्तेत आल्यानंतर या योजनेस मंजुरी मिळाली होती. चार वर्षांत या योजनेचे काम पूर्ण करण्यात येऊन १९९९ मध्ये या योजनेचे लोकार्पण करण्यात आले. या योजनेत ब्रम्हपुरी तालुक्यातील ३, तर नागभीड तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे. या योजनेचे संचालन जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडे आहे. या योजनेत समाविष्ट असलेली दोन गावे आता नागभीड नगर परिषदेत समाविष्ट झाली आहेत.

योजना कोणतीही असो, त्या योजनेची यशस्विता लोकांच्या सहकार्यावर अवलंबून असते. नागरिकांनी संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेकडे आणि या स्वायत्त संस्थांनी संबंधित विभागाकडे कराचा वेळेवर भरणा केला तर योजना चालविण्यास अडचण निर्माण होणार नाही. मात्र, तपाळ पाणीपुरवठा योजनेच्या बाबतीत असे होत नसल्याचे वास्तव समोर आले आहे.

बाॅक्स

अशी आहे थकबाकी

पाणी करापोटी तपाळ पाणीपुरवठा योजनेचे ५३ लाख ८६ हजार ५२९ रुपये विविध ग्रामपंचायती आणि नगर परिषदेकडे थकीत असल्याची माहिती आहे. यात नागभीड नगर परिषदेकडे १३ लाख ८९ हजार २४ रुपये, चिखलपरसोडी २ लाख ३१ हजार १६८ रुपये, नवखळा १० लाख १७ हजार ७९२ रुपये, देवटेक १ लाख ४० हजार ९६७ रुपये, बालापूर खुर्द २ लाख १० हजार ४२६ रुपये, मौशी ६ लाख ४१ हजार ३५४ रुपये, ढोरपा २ लाख १६ हजार ५५३ रुपये, चिकमारा ३ लाख ९ हजार ८३७ रुपये, तोरगाव खुर्द ५ लाख ४४ हजार ६७२ रुपये आणि तोरगाव बुज या ग्रामपंचायतीकडे ६ लाख ८४ हजार ७३६ रुपये थकीत असल्याची माहिती आहे.

बाॅक्स

योजनेत नानाविध अडचणी

तपाळ ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहे. या योजनेत अनेक कामगार कार्यरत आहेत. त्यांचा वेतन, विद्युत बिल, योजनेची देखभाल दुरुस्ती अशा नानाविध अडचणी या योजनेसमोर आहेत.

नुकतीच झालेली वसुली

नागभीड नगर परिषदेने नुकतीच पाच लाख रुपयांची वसुली अदा केल्याची माहिती आहे. मौशी ग्रामपंचायतीने एक लाख, ढोरपा ग्रामपंचायतीने ६७ हजार, तर तोरगाव खूर्द ग्रामपंचायतीने ५० हजार रुपयांचा भरणा केला असल्याची माहिती संबंधित यंत्रणेने दिली.

Web Title: Rs 54 lakh in arrears of Tapal water supply scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.