चंद्रपूर : गोल बाजार सर्वाधिक गजबजलेला परिसर आहे. या ठिकाणी व्यावसायिकांची मोठी चाळ आहे. येथे दररोज भाजीबाजारही भरतो. पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्याने रस्ता अकारण अरुंद होऊन या रस्त्यावरून वाहन काढताना त्रास होत आहे. मनपाने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या दुरवस्थेने
नागरिक त्रस्त
चिमूर : तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्ते पूर्णत: उखळले. अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
गडचिरोली मार्गावर
गतिरोधक तयार करा
मूल : मूल ते गडचिरोली मार्गावरील चौक परिसरात गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत. खेडी ते चकपिरंजी या रस्त्यावर एकही गतिरोधक नाही. त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. अपघाताची शक्यता वाढतच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
वरोऱ्यात मोकाट जनावरांचा हैदोस
वरोरा : येथील चौपदरी महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत जनावरांचा मृत्यू झाला होता. जनावरांमुळे वाहनांचेही अपघात झाले आहेत. वरोरा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. येथील आनंदवन चौकातही मोठ्या प्रमाणात जनावरांचा ठिय्या असतो. त्यामुळे रहदारीला अडचणी येत आहे.
मोकाट कुत्र्यांचा
बंदोबस्त करावा
राजुरा : शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यामध्ये कुत्रे उभे राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. रात्रीच्या सुमारास घराबाहेर निघणे कठीण झाले. नगरपरिषदेने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
घाणीच्या साम्राज्याने नागरिक त्रस्त
चंद्रपूर : बाबूपेठ वार्डात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या भागात नियमित स्वच्छता होत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. नाल्या तुडुंब भरल्या आहेत. डासांचे प्रमाण वाढले. रस्त्यावर घाण साचली आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.
वळण रस्त्यावर रेडियम पट्ट्या लावा
कोरपना : शहरातून जाणाऱ्या चंद्रपूर- आदिलाबाद वणी मार्गावरील वळण रस्ते धोकादायक बनले आहे. यामुळे अपघात होत आहेत. या रस्त्यावरुन दिवसरात्र वाहनांची वर्दळ असते. रस्ता सुरक्षेसाठी रेडियम पट्ट्या लावण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.
कचरा पेट्यांची
संख्या वाढवावी
ब्रह्मपुरी : शहराची लोकसंख्या वाढली. परंतु, त्यामानाने वार्डनिहाय कचरा पेट्या लावण्यात आल्या नाही. त्यामुळे बरेच जण रस्त्यावरच कचरा टाकतात. हा प्रकार टाळण्यासाठी कचरा पेट्यांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.