मूलने अनुभवला विकासयात्रेचा झंझावात
By Admin | Updated: August 19, 2016 01:53 IST2016-08-19T01:53:15+5:302016-08-19T01:53:15+5:30
मूल शहराच्या रस्ते विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करण्यात आला आहे.

मूलने अनुभवला विकासयात्रेचा झंझावात
- सुधीर मुनगंटीवार : मूलला अव्वल दजार्चे शहर म्हणून विकसित करणार
- मूल : मूल शहराच्या रस्ते विकासासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करण्यात आला आहे. तसेच नगर परिषद क्षेत्रातील विकासकामांसाठी २० कोटी रुपये, आठवडी बाजार आणि जलवाहिनी विकासासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मूल शहर हे राज्यातील अव्वल दर्जाचे शहर म्हणून विकसित करण्याचा आपला मानस असून या प्रक्रियेत नागरिकांचे सहकार्य आपणास अपेक्षित आहे, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी केले. यावेळी विकासकामांप्रती समर्पित एका लोकप्रतिनिधीच्या विकासयात्रेचा एक झंझावाती दिवस मूल शहराने अनुभवला.
मूलमध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, मूल शहराचा विकास वेगाने होत असून शहरात २० कोटी रुपयांचा निधी खर्च करून सिमेंट रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात येत आहे. मूल शहरात अत्याधुनिक स्वरूपाचे बसस्थानक उभारण्याची तयारी पूर्ण झाली आहे. राज्य महामार्गाच्या विकासासाठी ३० कोटी रूपये व इतर रस्त्यांसाठी ४५ कोटी रुपये असा एकूण ७५ कोटी रुपयांचा निधी मूल शहरासाठी उपलब्ध करण्यात आला आहे. मूल अव्वल क्रमांकाचे शहर करण्याचा निर्धार आपण केला आहे. शहरात आठ कोटी रुपये खर्च करून माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांच्या स्मारकाचे बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम, प्रशासकीय भवनाचे बांधकाम अशी विविध विकास कामे आपण केली असून शहरातील तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभाग क्र. १, प्रभाग क्र. २, प्रभाग क्र. ३ आणि प्रभाग क्र. ४ मध्ये सिमेंट रस्ते व नाली बांधकाम तसेच ताडाळा रोडवरील मुस्लीम स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे व शेडचे भूमिपूजन, नदीघाट मूल येथे स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे व शेडचे भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, नगराध्यक्षा रीना थेरकर, जिल्हा परिषद सभापती देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता बालपांडे, उपविभागीय अधिकारी मनिषा दांडगे, कार्यकारी अभियंता जयस्वाल, उपविभागीय अभियंता बुरांडे, प्रभाकर भोयर, चंद्रकांत आष्टनकर, नंदू रणदिवे आदींची उपस्थिती होती.
या भूमिपूजन कार्यक्रमांना शहरातील नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)